राष्ट्रवादीत जोरदार इनकमिंग : माजी आमदार रमेश कदम यांची घरवापसी

NCP

मुंबई : महाराष्ट्रात सत्ताबदल झाल्याने अनेक आजी-माजी आमदार व खासदार राष्ट्रवादी काँग्रेसच्या वाटेवर असल्याची जोरदार चर्चा होती. त्यानंतर आता राष्ट्रवादीत जोरदार इनकमिंग सुरू झाले आहे. रत्नागिरीतील राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी आमदार रमेश कदम यांची पक्षात घरवापसी झाली. राष्ट्रवादीला रामराम ठोकल्यानंतर शेकाप-भाजप-काँग्रेस असा झालेला त्यांचा राजकीय प्रवास अखेर वर्तुळाकृती होऊन राष्ट्रवादीतच पूर्ण झाला आहे.

यावेळी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील आणि खासदार सुनील तटकरे उपस्थित होते. या प्रसंगी भाजपाचे उस्मान मोमीन, वंचित बहुजन आघाडीचे तालुकाध्यक्ष शशिकांत मोकल व उषा चौधरी यांनी पक्षप्रवेश केला. विशेष म्हणजे सुनील तटकरे यांच्या विरोधात रमेश कदम यांनी शेकापकडून लोकसभा निवडणूक लढवली होती.

राष्ट्रवादीची स्थापना झाल्यापासून रमेश कदम यांचे पक्षाला मोठे योगदान लाभले. काही कारणांमुळे मधल्या काळात ते पक्षापासून वेगळे झाले. मात्र रत्नागिरी जिल्ह्यातील अनेक निवडणुकांमध्ये त्यांचा मोलाचा वाटा आहे. कोकणात आता पक्ष मजबुतीसाठी त्यांच्यासह पुन्हा जोमाने कामास सुरुवात करू, असा विश्वास तटकरे यांनी दिला.

अनेक मान्यवरांनी पक्षात प्रवेश करण्याची इच्छा व्यक्त केली आहे. पण राजकारण हे बेरजेचे करायचे, वजाबाकी-भागाकाराचे नाही. पक्ष बळकटीसाठी आपले चौफेर प्रयत्न सुरू आहेत. शरद पवार यांच्या नेतृत्वाखाली काम करण्याची अनेकांची इच्छा आहे. पक्ष सोडून गेलेल्या नेत्यांनीही घरवापसीची इच्छा प्रकट केली आहे. त्यामुळे सर्व चांगल्या प्रवृत्तीचे लोक पक्षात आणण्याचे प्रयत्न सुरू आहेत. ” असे संकेत यावेळी जयंत पाटील यांनी दिले.

दरम्यान, रमेश कदम यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केल्यानंतर आपण पुन्हा शरद पवार, अजित पवार आणि सुप्रिया सुळे यांच्या मार्गदर्शनाखाली काम करण्यास उत्सुक असल्याचे सांगितले.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER