ठाणे जिल्हा बँकेच्या निवडणुकीत राष्ट्रवादीचे वर्चस्व? उर्वरित जागेसाठी महाविकास आघाडी एकत्र

NCP-Shivsena

ठाणे : ठाणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची निवडणूक (Thane District Bank election) महाविकास आघाडीने एकत्रित लढवण्याचे निश्चित केले आहे. या निवडणुकीत सहा उमेदवार बिनविरोध निवडून आले असून उर्वरित १५ जागांसाठी महाविकास आघाडीने आपल्या उमेदवारांची नावे रविवारी घोषित केली. शिवसेना नेते, नगरविकास मंत्री आणि ठाण्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) तसेच राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि गृहनिर्माण मंत्री डॉ. जितेंद्र आव्हाड(Jitendra Awhad) यांनी उमेदवारांची घोषणा केली.

मार्च महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात होणाऱ्या ठाणे मध्यवर्ती सहकारी बँकेची निवडणूक महाविकास आघाडी एकत्रित लढवणार असल्याची माहिती ठाण्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे आणि गृहनिर्माण मंत्री डॉ. जितेंद्र आव्हाड यांनी दिली होती. ठाणे मध्यवर्ती सहकारी बँकेसाठी येत्या ३० मार्च रोजी मतदान आणि ३१ मार्च रोजी मतमोजणी होणार आहे.

या निवडणुकीपूर्वीच राष्ट्रवादी काँग्रेसचे बाबाजी पाटील आणि बाबूराव दिघा; तर शिवसेनेचे अमित घोडा हे बिनविरोध निवडून आले आहेत. तर उर्वरित पंधरा जागांसाठी महाविकास आघाडीकडून पंडीत पाटील (भिवंडी), सुधीर पाटील (कल्याण) , सुभाष पवार (मुरबाड), मधुकर पाटील (पालघर), प्रकाश वरकुटे (शहापूर), सुनील पाटील (विक्रमगड), किरण सावंत (वाडा) , लाडक्या खरपडे (तलासरी), काँग्रेस (हौसिंग मजुर संस्था), हणमंत जगदाळे (पतसंस्था), निलेश सांबरे (ओबीसी) , अनिल शिंदे (अनुसूचित जाती जमाती), विशाखा खताळ (व्हीजेएनटी), प्राजक्ता पानसरे आणि शोभा म्हात्रे (महिला प्रतिनिधी दोन जागा) यांना अधिकृत उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. एकनाथ शिंदे आणि जितेंद्र आव्हाड यांनी अधिकृत उमेदवारांची नावे जाहीर केली.

या निवडणुकीमध्ये कृषी-पतसंस्थांमधून १४, पगारदार पतसंस्थांमधून १, खरेदी-विक्री संघातून १, महिला राखीव २, अनु.जाती-जमातींसाठी १ आणि ओबीसींसाठी १ जागा राखीव आहे. ३ हजार ६८ मतदार या निवडणुकीमध्ये मतदानाचा अधिकार बजावणार आहेत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER