राष्ट्रवादीच्या चाकणकरांचा हाथरस घटनेवरून संताप; उत्तर प्रदेशात रामराज्य आणायचं की गुंडाराज? योगींना प्रश्न

Yogi Adityanath - Rupali Chakankar

पुणे : उत्तर प्रदेशात (Uttar Pradesh) पुन्हा एक निर्भया प्रकरण घडले आहे. देश कोरोनाच्या (Corona) भयंकर परिस्थितीतून जात असताना आणि लॉकडाऊनमध्ये (Lockdown) असतानाही देशात निर्भया प्रकरण घडले आहे. या प्रकरणामुळे देशभरात संताप व्यक्त करण्यात येत आहे. त्यातच राष्ट्रवादीच्या महिला प्रदेशाध्यक्ष रूपाली चाकणकर (Rupali Chakankar) यांनी मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ (Yogi Adityanath) यांना उत्तर प्रदेशात रामराज्य आणायचंय की गुंडाराज?, असा सवाल केला आहे.

त्याचप्रमाणे रुपाली चाकणकर यांनी उत्तर प्रदेश पोलींसावरही निशाणा साधला आहे. “पीडितेचा मृतदेह परस्पर जाळण्याचे आदेश पोलीस प्रशासनाला कुणी दिले”, असा सवाल करत या प्रकरणाची खोलवर चौकशी झाली पाहिजे, असं चाकणकर म्हणाल्या.

एवढेच नाही तर योगी सरकारवर चाकमकर यांनी शाब्दिक हल्ला चढवला.

“योगी सरकारने त्यांच्या जाहिरातबाजीमध्ये जी कायदा सुव्यवस्था दाखवली होती, ज्या रामराज्याची स्वप्न नागरिकांना दाखवली होती मात्र हाथरस प्रकरणानंतर असं म्हणावं लागेल की त्या नागरिकांची स्वप्न धुळीला मिळाली आहेत. योगी सरकारने उत्तर प्रदेशातील नागरिकांची दिशाभूल केलीये. मुळात योगींकडे चांगली कायदा सुव्यवस्थाच अस्तित्वात नाहीये”, अशा शब्दांत चाकणकर यांनी योगी सरकारवर टीका केली आहे.

“उत्तर प्रदेशातील मुली, महिला तसंच सामान्य नागरिक भयभीत आणि असुरक्षित आहेत. गेल्या काही दिवसांपासून उत्तर प्रदेशात ज्या घटना घडतायेत, सत्ताधाऱ्यांच्या आशीर्वादाने ज्या प्रकारची गुंडगिरी सुरु आहे, त्यावरून आम्हाला असा प्रश्न पडतो की योगीजी, उत्तर प्रदेशात आपल्याला रामराज्य आणायचंय की गुंडाराज?”, असा सवाल चाकणकर यांनी विचारला.

तर, एरवी पुढे येऊन आवाज उठवणा-या स्मृती इरामी आता गप्प का असा प्रश्नही रुपाली चाकणकर यांनी केला आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER