अंबरनाथमध्ये राष्ट्रवादीचा काँग्रेसला झटका, काँग्रेस पदाधिकाऱ्यांचा राष्ट्रवादीत प्रवेश

Congress office bearers enter NCP

ठाणे : आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर फोडाफाडीच्या राजकारणाला वेग आला आहे. अंबरनाथ, बदलापूर पालिका निवडणुकीत स्थानिक पातळीवर महाविकास आघाडी एकत्र येण्याची शक्यता धूसर झाली आहे. त्यामुळे फोडाफाडीला वेग आला आहे. आघाडीतील एकमेकांचे नगरसेवक, पदाधिकारी गळाला लावण्याचे प्रकार अंबरनाथमध्ये सुरू झाले आहेत. अंबरनाथ नगरपालिकेतील काँग्रेसचे (Congress) निष्ठावंत माजी नगरसेवक आणि पदाधिकाऱ्यांनी काँग्रेसला रामराम ठोकत गृहनिर्माणमंत्री जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये (NCP) प्रवेश केला.

अंबरनाथ शहरात नगरपालिका निवडणुकीच्या तोंडावर गृहराज्यमंत्री जितेंद्र आव्हाड यांच्या मुंबई कार्यालयात त्यांच्याच उपस्थितीत काँग्रेसच्या माजी नगरसेविका श्रृती सुरेश सिंग (Shruti Suresh Singh), काँग्रेसचे युवक शहर अध्यक्ष प्रकाश पाटील (Prakash Patil), माजी नगरसेवक नरेंद्र काळे (Narendra Kale), काँग्रेस उत्तर भारतीय कक्षाचे अध्यक्ष सुरेश सिंग (Suresh Singh) यांना राष्ट्रवादीत प्रवेश देण्यात आला. निवडणुकीनंतर वरिष्ठांच्या आदेशानुसार आघाडीतील पक्ष एकत्रच येतील. त्यामुळे राष्ट्रवादीच्या नेतृत्वाखाली काम करण्यासाठी काँग्रेस पक्षातील नगरसेवकांनी राष्ट्रवादीत प्रवेश घेतल्याचे शहराध्यक्ष सदाशिव पाटील यांनी स्पष्ट केले. राष्ट्रवादीच्या या भूमिकेमुळे काँग्रेस येत्या निवडणुकीत राष्ट्रवादीच्या प्रभागात दमदार उमेदवार उतरवेल. परिणामी आघाडीच्या लढाईत भाजपला याचा लाभ होण्याची शक्यता आहे. त्यामुळे राष्ट्रवादीच्या वरिष्ठ नेत्यांनीही आघाडीचा धर्म पाळण्याची गरज असल्याचे काँग्रेस ब्लॉक अध्यक्ष प्रदीप पाटील यांनी सांगितले.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER