
गोंदिया : राष्ट्रवादी काँग्रेसकडून काँग्रेस पक्षाला धक्क्यावर धक्के बसत आहे. साध्य राष्ट्रवादीमध्ये येणाऱ्यांची संख्या मोठ्याप्रमाणात वाढत चालली आहे. अशातच पूर्व विदर्भातील एक बडा नेता राष्ट्रवादीच्या गळाला लागला आहे. महाराष्ट्र प्रदेश कॉंग्रेसचे सचिव डॉ. योगेंद्र भगत यांनी खासदार प्रफुल्ल पटेल यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. त्यामुळे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांच्या गृहनगरातच काँग्रेसला मोठा धक्का मानला जात आहे.
काही दिवसांपूर्वी खासदार प्रफुल्ल पटेल(Praful Patel) यांच्या तिरोडा भेटी दरम्यान डॉ. भगत प्रफुल्ल पटेल यांच्या गाडीत एकत्र दिसले होते. तेव्हापासूनच डॉ भगत राष्ट्रवादीत प्रवेश करू शकतात अशी अटकळ सुरू होती. डॉ. भगत हे नेहमीच कॉंग्रेसच्या निष्ठावंतांमध्ये मोजले जातात. ते प्रथम भंडारा जिल्हा परिषदेच्या १९९२ मध्ये झालेल्या निवडणुकीत अपक्ष उमेदवार म्हणूनविजयी झाले होते. त्यानंतर २००० मध्ये गोंदिया जिल्हा परिषदेत कॉंग्रेसचे शिक्षण व आरोग्य सभापती झाले आणि त्यानंतर २०१० मध्ये जिल्हा परिषद सदस्य झाले. सध्या ते महाराष्ट्र प्रदेश कॉंग्रेसच्या सचिव पदावर होते.
त्यांच्या प्रवेशाच्या संदर्भात डॉ. भगत म्हणाले की, जिल्ह्यातील कॉंग्रेस कुमकुवत झाली आहे आणि जिल्ह्यात ओबीसी नेतृत्व नसल्यामुळे बहुसंख्य ओबीसी समाज कॉंग्रेसपासून दूर जात आहे. त्याचवेळी, जिल्ह्यातील नवीन लोकांकडे जबाबदारी देऊन जुन्या निष्ठावंतांना संघटनेपासून दूर ठेवले जात होते. डॉ. भगत यांच्या माध्यमातून जिल्ह्यातील विशेषत: तिरोडा तहसीलमध्ये आणखी एक सक्षम आणि स्वच्छ प्रतिमेचा ओबीसी चेहरा मिळाल्याने राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये उत्साहाचे वातावरण दिसत आहे.
प्रफुल्ल पटेल यांच्या गोंदिया निवासस्थानी झालेल्या पक्ष प्रवेशावेळी माजी आमदार राजेंद्र जैन, आमदार मनोहर चंद्रिकापुरे, जिल्हाध्यक्ष विजय शिवनकर, म्हाडाचे माजी अध्यक्ष नरेश माहेश्वरी, गंगाधर परशुरामकर, केवल बघेले, गुड्डू बोपचे, अविनाश काशिवार आदी उपस्थित होते.
बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला