‘मी उपमुख्यमंत्री व्हावे ही कार्यकर्त्यांची मनापासूनची इच्छा’ – अजित पवार

Ajit Pawar

पुणे :- रविवारी देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत झालेल्या चर्चेच्या विषयी काहीही भाष्य करणार नाही, मला बारामतीत प्रचंड कामे करायची आहेत. मला ज्यांनी निवडून दिले त्यांची कामे करणे हेच माझे एकमेव काम आहे, तेच मी करत राहणार आहे, मी उपमुख्यमंत्री व्हावे अशी कार्यकर्त्यांची मनापासूनची इच्छा आहे. मात्र त्याबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हेच निर्णय घेतील असे स्पष्टीकरण राष्ट्रवादी काँग्रेसचे जेष्ठ नेते अजित पवार यांनी दिले. ते आज बारामतीत बोलत होते.

यावेळी ते म्हणाले की, खातेवाटपासंदर्भात मुख्यमंत्रीच काय ते अधिक विस्ताराने सांगू शकतील.

मी आणि देवेंद्र फ़डणवीस शेजारी बसलो म्हणजे लगेच काहीतरी सुरु झालय अस समजण्याच कारण नाही, आम्ही शेजारी बसून हवापाण्याच्याच गप्पा मारल्यात अशा शब्दात माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी फडणवीस व त्यांच्या भेटीचे वर्णन केले. हे वर्णन करताना त्यांचा मूड मिश्कील शैलीचा होता.

ही बातमी पण वाचा : देवेंद्र फडणवीस आणि अजित पवारांत रंगल्या गप्पा

पवार म्हणाले, ”राजकीय व्यक्ती कधी कायमचे एकमेकांचे शत्रू नसतात, सत्ताधारी किंवा विरोधक एकत्र आल्यानंतर एकमेकांना नमस्कार होतो, एकत्र बसतात, चर्चा होते. यात शंका घेण्याची गरज नाही. संजय शिंदे यांनी आग्रहाने मला व इतरांना बोलावल होत, म्हणून त्या लग्नाला आम्ही गेलो होतो, खुर्च्या ठेवताना अशा ठेवल्या की माझी व देवेंद्र यांची खुर्ची शेजारी शेजारी होती. त्यामुळे शेजारी बसल्यावर आम्ही थोडीफार इकडची तिकडची चर्चा केली. असे म्हणत त्यांनी वेळ मारून नेली.