गोवा विधानसभेसाठी पवारांचा अ‍ॅक्शन प्लॅन; स्वबळावर लढण्याची तयारी- प्रफुल्ल पटेल

ncp-will-contest-2022-goa-assembly-polls-says-praful-patel

मुंबई : गोवा विधानसभा निवडणुकीसाठी (Goa-assembly-polls) अजून दोन वर्षांचा कालावधी शिल्लक आहे. मात्र राष्ट्रवादी काँग्रेसने आतापासूनच कंबर कसली आहे. संपूर्ण ताकदीनिशी गोवा विधानसभा निवडणूक स्वबळावर लढवण्यासाठी पक्षाध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी रणनीती आखली आहे. याबाबत माहिती देताना पक्षाचे ज्येष्ठ नेते प्रफुल्ल पटेल यांनी गोव्याच्या निवडणुकीत संपूर्ण ताकदीनिशी मैदानात उतरू. काँग्रेससोबत आघाडी करणार नाही, महाराष्ट्रातील ज्येष्ठ मंत्र्याला गोव्याचे प्रभारीपद देऊ, असे स्पष्ट केले आहे.

या मुद्द्यावरून बोलताना पटेल म्हणाले की, गोव्यातील सर्व ४० विधानसभा मतदारसंघांत स्वबळावर निवडणूक लढवण्याच्या स्थितीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष तेव्हा असेल. आघाडी करायची झालीच तर जागावाटपाचा फॉर्म्युला तेव्हा निश्चित करता येईल. ‘पीटीआय’ला दिलेल्या मुलाखतीत पटेल यांनी पक्षाची गोव्यातील आगामी वाटचाल सांगितली. काँग्रेस आणि भाजप या पक्षांना पर्याय देऊ असं सांगत काँग्रेससोबत आघाडीची शक्यता पटेल यांनी आताच फेटाळून लावली आहे. राष्ट्रवादी समविचारी पक्षांच्या साथीने गोव्यात पुढील सरकार स्थापन करू शकेल, असा विश्वासही त्यांनी बोलून दाखवला. म्हणजेच स्वबळावर निवडणूक लढवून काँग्रेस किंवा भाजपेतर पक्षांच्या साथीने राष्ट्रवादीचा सत्तास्थापनेचा विचार दिसत आहे. दरम्यान, पुढील दीड वर्ष आम्ही अधिक मेहनत घेऊ.

महाराष्ट्र सरकारमधील ज्येष्ठ मंत्र्याला गोव्याचे प्रभारी करू, असा अ‍ॅक्शन प्लॅनही प्रफुल्ल पटेल यांनी सांगितला. २२ नोव्हेंबरला पणजीमध्ये राष्ट्रवादीचे पक्ष कार्यालय सुरू करणार असल्याची माहितीही त्यांनी दिली. महाविकास आघाडी सरकारमधील कोणत्या ज्येष्ठ मंत्र्याला गोव्याचे प्रभारीपद दिले जाणार, याची चर्चा रंगली आहे. शरद पवार गोव्यात विश्वासार्ह आणि पर्यायी नेतृत्व देईल. पक्षाचे अनेक समर्थक गोव्यात आहेत. जनतेचा विश्वास जिंकण्यासाठी ते दिवसरात्र मेहनत करतील आणि निवडणुकांना सामोरे जातील, अशी खात्रीही पटेल यांनी व्यक्त केली.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजलाMT LIKE OUR PAGE FOOTER