तर… राष्ट्रवादीची ही नेता होईल महाराष्ट्राची पहिली महिला मुख्यमंत्री!

Supriya Sule

मुंबई : महाराष्ट्रात शिवसेना – राष्ट्रवादी – कॉंग्रेसचे संयुक्त सरकार येणार यासाठी आघाडीने सहमती दिली आहे. पाच वर्षे राज्याला स्थिर सरकार देण्यासाठी आघाडीने एकसुत्री कार्यक्रमदेखील तयार केला आहे. मात्र, या एकसुत्री कार्यक्रमात नेमके काय ठरले हे अद्याप उघड व्हायचे आहे. ज्या मुख्यमंत्रीपदावरून शिवसेनेने भाजपसोबत काडीमोड करून घेतला ते मुख्यमंत्रीपद अखेर कोणाकडे जाणार मुख्यमंत्रीपदाचा फॉर्मुला कसा ठरला आहे. हे अद्याप तरी गुलदस्त्यात आहे. परंतु शिवसेना भाजपसोबत अडीच वर्षे मुख्यमंत्रीपद वाटून घेणार होते. महाविकास आघाडीच्या सरकारमध्ये मुख्यमंत्रीपद हे पाच वर्षांसाठी शिवसेनेलाच देण्यात येण्याच्या चर्चा आहे तर दुसरीकडे अडीच वर्षे मुख्यमंत्रीपद मिळविण्याचा राष्ट्रवादीचा प्रयत्न सुरु असल्याचे समजते. मात्र असे झाल्यास राज्याला पहिली महिला मुख्यमंत्री मिळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

शिवसेना आणि राष्ट्रवादीला अडीच अडीच वर्षांसाठी मुख्यमंत्रीपद देऊन पाच वर्षांसाठी काँग्रेसचा उपमुख्यमंत्री असेल अशी एक शक्यता व्यक्त केली जात आहे. असं झाल्यास राष्ट्रवादीकडून मुख्यमंत्रीपदी खासदार सुप्रिया सुळे यांना संधी देण्यासंदर्भात चर्चा सुरु असल्याचे समजते. राष्ट्रवादीला अडीच वर्षांसाठी मुख्यमंत्रीपद मिळाले तर प्रमुख दावेदारांच्या यादीमध्ये सुप्रिया यांचे नाव आघाडीवर असल्याची चर्चा आहे.

शरद पवारांची मुख्यमंत्री पदासाठी संजय राऊतांना सर्वाधिक पसंती

सुप्रिया या बारामतीच्या विद्यमान खासदार आहेत. त्या राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या कन्या असून गेले अनेक वर्षे त्या राजकारणात सक्रीय आहेत. २००६ साली त्या राज्यसभेवर पहिल्यांदा खासदार म्हणून निवडून गेल्या. २००९ साली त्यांनी बारामती लोकसभा मतदारसंघामधून निवडणूक लढवली आणि त्या जिंकून आल्या. यंदा त्यांनी याच मतदारसंघातून विजयाची हॅट्रीक केली आहे. सध्या राज्यातील सत्ता संघर्षासंदर्भात सुरु असलेल्या राष्ट्रवादी अनेक बैठकींना त्या उपस्थित असतात. अडीच वर्षासाठी राष्ट्रवादीला मुख्यमंत्रीपद मिळाल्यास सुप्रिया यांचा मुख्यमंत्रीपदासाठी विचार व्हावा अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनीही केल्याची बातमी समोर येत आहे.

असे झाल्यास महाराष्ट्राची पहिली महिला मुख्यमंत्री होण्याचा सर्वोच्च मान राष्ट्रवादीच्या ज्येष्ठ नेत्या सुप्रिया सुळे यांना मिळेल.