राष्ट्रवादीत पदवीधर आमदार होण्यासाठी धडपड

NCP Logo

कोल्हापूर : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात पदवीधर मतदारसंघातून उमेदवारी मिळवण्यासाठी मोठी रस्सीखेच आहे. उमेदवारीसाठी साताऱ्याचे खासदार श्रीनिवास पाटील यांचे पुत्र सारंग, सांगलीतील क्रांती कारखान्याचे अध्यक्ष अरुण लाड, कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक भय्या माने, सोलापूर जिल्हा कार्यकारी अध्यक्ष उमेश पाटील आणि इतिहास अभ्यासक प्रा. श्रीमंत कोकाटे हे प्रयत्न करत असल्याचे समजते.

पदवीधर मतदार संघातून निवडणूक लढविण्यास इच्छुक असलेल्या सर्वच उमेदवारांनी आपापल्या स्तरावर मतदारनोंदणी केली आहे. काहींनी पक्षाकडे निवडणूक लढविण्याची इच्छा व्यक्त केली आहे. काहींनी संघटनेच्या माध्यमातून उमेदवारीसाठी प्रबळ दावा करीत पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार, उपमुख्यमंत्री अजित पवार, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांची भेट घेतली आहे. उमेदवारीची घोषणा झाली नाही. गेल्या निवडणुकीत भाजपचे आमदार चंद्रकांत पाटील यांना ६१४५३, राष्ट्रवादीचे उमेदवार सारंग पाटील यांना ५९०७३ तर अपक्ष म्हणून निवडणूक लढविलेल्या अरुण लाड यांना ३७,१८९ मते मिळाली होती. सारंग पाटील व लाड यांच्यातील मतविभागणी चंद्रकांत पाटील यांच्या पथ्यावर पडली होती. राष्ट्रवादीच्या पाटील यांचा केवळ २३८० मतांनी पराभव झाला. त्यामुळे यंदा उमेदवारी कोणाला आणि कोण थांबणार यावर विजयाची पुढील गणिते अवलंबून असणार आहेत.

सर्वच इच्छुकांनी पाचही जिल्ह्यांत संपर्क ठेवला. पक्षाच्या आयटी सेलचा प्रदेशाध्यक्ष, बूथ कमिट्यांची स्थापना या माध्यमातून सर्वांशी जोडलो आहे. पदवीधरांच्या प्रश्नांची जाण आहे. मतदार नोंदणी केली आहे. राष्ट्रवादीची उमेदवारी कोणाला मिळणार याबाबत कार्यकर्त्यात उत्सुकता आहे.