आंदोलनजीवी जमात; राष्ट्रवादीने उडवली भाजपने केलेल्या आंदोलनांची खिल्ली

मुंबई : शेतकरी कायद्यांवरून निर्माण झालेल्या वादंगाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी आज संसदेत देशभरातील आंदोलनकर्त्यांचा आंदोलनजीवी जमात म्हणून उल्लेख केला. मोदींच्या या विधानावर देशभरातून प्रतिक्रिया येत असून राष्ट्रवादीनेही एक व्हिडीओ जारी करून मोदींच्या या विधानाची खिल्ली उडवली आहे. भाजपने आजवर केलेले आंदोलन आणि भाजप नेत्यांची आंदोलनावरील भूमिका याचा या व्हिडीओत समावेश असून त्यातून भाजपचा चेहराच दुटप्पी असल्याचा दाखवण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे.

राष्ट्रवादीने एक मिनिटाचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. या व्हिडीओवर ‘ही पाहा, हीच ती पंतप्रधान नरेंद्र मोदींनी उल्लेख केलेली नवीन ‘आंदोलनजीवी’ जमात’ असं कॅप्शन देण्यात आलं आहे. तसेच व्हिडीओवर पाच कावळ्यांचे फोटो दाखवण्यात आले आहेत. या व्हिडीओच्या सुरुवातीला पंतप्रधानांचं संसदेतील आजचं 13 सेंकदाचं भाषण दाखवण्यात आलं आहे. देशात आंदोलनजीवी नावाची नवी जमात आल्याचं मोदी या व्हिडीओत म्हणताना दिसत आहे. त्यानंतर या व्हिडीओत भाजप आणि विश्व हिंदू परिषदेने आजवर घेतलेल्या आंदोलनाचे फोटो दाखवण्यात आले आहेत. तसेच विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, किरीट सोमय्या आणि भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांचे बाईट्सही दाखवण्यात आले असून त्यात ते राज्य सरकारला आंदोलन करण्याचा इशारा देत असल्याचं दाखवण्यात आलं आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER