..तर राष्ट्रवादीने भाजपसोबत सरकार स्थापन करावं – रामदास आठवले

Ramdas Athawale-devendra fadnavis and sharad pawar.jpg

मुंबई : शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) आणि विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या भेटीमुळे राजकीय तर्कवितर्क लावले जात आहे. त्यातच केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले (Ramdas Athawale) यांनी एक वक्तव्य केलं आहे. शिवसेना आमच्यासोबत आली नाही तर राष्ट्रवादीने भाजप-रिपाइंसोबत यावं. रिपाइं आधीही राष्ट्रवादीसोबत होती. त्यामुळे भाजप-राष्ट्रवादी आणि रिपाइं असं सरकार महाराष्ट्रात बनवू शकतो. पवारांना भविष्यात सत्तेत संधी मिळू शकते. शरद पवार यांच्यासारखा अनुभवी नेते एनडीएमध्ये आले तर नरेंद्र मोदींना त्यांची साथ मिळेल आणि देशाच्या विकासासाठी फायदा होईल, असा नवा फार्मुला आठवले यांनी राष्ट्रवादीसमोर ठेवला आहे.

शिवसेनेनं भाजपसोबत यावं अशी साद रिपाईंचे अध्यक्ष आणि केंद्रीय मंत्री रामदास आठवलेंनी घातली आहे. शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेसचं सरकार ५ वर्षे चालणार नाही. कामं होत नसल्यानं अनेक आमदार नाराज आहेत. त्यामुळे बंडखोरीची शक्यता आहे. तसं झाल्यास सरकार कोसळेल आणि राज्यात भाजपची सत्ता येईल, असं आठवले म्हणाले. यावेळी त्यांनी शिवसेनेला सोबत येण्याची साद घेतली. ‘उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्री होऊन एक वर्ष झालं आहे. त्यांची इच्छा असेल तर त्यांना आणखी एक वर्ष मुख्यमंत्रीपद द्यावं. उरलेली तीन वर्षे देवेंद्र फडणवीस यांच्याकडे मुख्यमंत्रीपद द्यावं. आणि सत्तेत ५०-५० टक्के वाटा ठेवावा आणि केंद्रात वाटा घ्यावा. अशा पद्धतीने मार्ग निघू शकेल,’ अशी ऑफर आठवलेंनी दिली.

उद्धव ठाकरें काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या चक्रव्युहात अडकू नये. त्या चक्रव्युहात अडकल्यामुळे त्यांना काही करता येत नाही, अशी परिस्थिती आहे. त्यामुळे शिवसेना-भाजप-रिपाइं एकत्र आल्यास फायदा होणार आहे, महाराष्ट्राचं भलं होणार आहे. केंद्राकडूनही महाराष्ट्रासाठी भरपूर पैसे आणता येतील, असंही आठवले म्हणाले.

महाविकास आघाडी सरकार पाच वर्षे टिकेल असा दावा शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी करत आहेत. याबाबत रामदास आठवले म्हणाले की, “पाच वर्ष टिकेल असं ते म्हणत असतील तरी टिकायला हवं. पण ते टिकायला हवं ना. मध्य प्रदेशचं सरकार गेलं. राजस्थान थोडक्यात हुकलं आणि महाराष्ट्राचा नंबर आहे. यामुळे महाराष्ट्रात भाजप-शिवसेना एकत्र आले तर चांगलंच आहे. असेही आठवले म्हणाले.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजलाMT LIKE OUR PAGE FOOTER