केरळमध्ये राष्ट्रवादी पक्ष फुटण्याची शक्यता ; शरद पवार ‘डॅमेज कंट्रोल’ करण्यासाठी करणार दौरा

Sharad Pawar

मुंबई : आपल्या पक्षासाठी शरद पवार (Sharad Pawar) हे पुन्हा संकटमोचक ठरणार आहे . केरळातील एलडीफ (LDF) सरकार आणि केरळ राष्ट्रवादीतील गटबाजीच्या पार्श्वभूमीवर डॅमेज कंट्रोल करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar), राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते प्रफुल्ल पटेल (Praful Patel) येत्या आठवड्यात केरळचा दौरा करणार आहेत. केरळ प्रदेश राष्ट्रवादीच्या कार्यकारिणीत पवार सहभागी होण्याची शक्यता असून, यावेळी राष्ट्रवादीतील (NCP) दोन्ही गटांशी ते चर्चा करणार असल्याची माहिती समोर येत आहे .

राष्ट्रवादीचे नेते आणि केरळचे परिवहनमंत्री ए के ससिंद्रम विरुद्ध केरळ राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष पी पीठंबरन यांच्यातील वाद शिगेला पोहचला आहे. पीठंबरन य़ांना आमदार मणी कप्पन यांचा पाठिंबा आहे. येत्या विधानसभा निवडणुकांसाठी सत्ताधारी एलडीएफ सोबत राहायचे की युडीएफसोबत (UDF) जायचे, यावरुन सध्या वाद सुरु आहे. कोणताही निर्णय घेतला तरी पक्षात फूट पडण्याची शक्यता आहे. केरळमध्ये राष्ट्रवादीच्या चार जागा आहेत, मात्र त्या जागा यावेळीही राष्ट्रवादीला मिळण्याची शक्यता कमी आहे. यातल्या पाला जागेसाठी कप्पन हे आग्रही आहेत. मात्र ही जागा काँग्रेसला मिळण्याचा दावा काँग्रेसी नेत्यांनी केल्याने, कप्पन गट नाराज आहे.

सोमवारी मुख्यमंत्री पीनराई विजयन यांनी याबाबत राष्ट्रवादीतील दोन्ही गटांशी चर्चा केली, मात्र त्यानंतरही तोडगा निघू शकलेला नाही. पाला विधानसभा जागेवर काँग्रेसने केलेल्या दाव्यानंतरही सीपीएम गप्प का, असा सवाल कप्पन यांनी केला आहे. तर एकट्या पाला जागेसाठी एलडीएफला सोडणे, ही आत्महत्या ठरेल असे सीसंद्रम यांचे मत आहे.

सोमवारी मुख्यमंत्र्यांशी झालेल्या बैठकीत प्रदेश राष्ट्रवादीचा निर्णय काहीही झाला तरी सीसंद्रम हे एलडीएफसोबतच राहतील, असा शब्द त्यांनी दिल्याची चर्चा आहे.

दरम्यान बुधवारी ससींद्रमतर गुरुवारी पीठांबरन आणि कप्पन यांनी शरद पवार यांची भेट घेतली असून, शरद पवारांचा त्यांनाच पाठिंबा असल्याचा दावाही केला आहे. ससींद्रम यांच्या मते केरळमधील वावातरण सध्या डाव्यांसाठी पोषक असून, यूडीएफ सोबत जाण्याची आवश्यकता नाही. आता शरद पवार यांना दौऱ्यात पक्षांतर्गत वाद मिटवणे आणि आगामी विधानसभेत कुणासोबत जायचे, यासंदर्भात चर्चा होणार आहे .

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजलाMT LIKE OUR PAGE FOOTER