मुख्यमंत्रिपदाचा अंतिम निर्णय उद्धव ठाकरेच घेतील- नवाब मलिक

Uddhav Thackeray And Nawab Malik

मुंबई : महाराष्ट्रात शिवसेना-काँग्रेस-राष्ट्रवादी या तिघांची आघाडी करून सरकार स्थापन करण्याबाबत सुरू असलेली चर्चा अंतिम टप्प्यात आल्याचे दिल्लीतून जाहीर झाले. आज (शुक्रवारी) मुंबईत शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांची एक बैठक होणार आहे. त्यानंतर ‘महाविकास आघाडी’विषयी अधिकृत घोषणा होण्याची शक्यता आहे. तत्पूर्वी ‘मुख्यमंत्री कोण होणार?’ या प्रश्नावरून अनेक तर्कवितर्क लावले जात असतानाच राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक यांनी मुख्यमंत्री शिवसेनेचाच होणार, असं स्पष्टपणे सांगितलं आहे.

तसेच शिवसेनाप्रमुख उद्धव ठाकरे हेच मुख्यमंत्रिपदाबाबत अंतिम निर्णय घेतील, असेही मलिक म्हणाले. “शिवसेना मुख्यमंत्रिपदामुळेच युतीतून बाहेर पडली आहे. त्यामुळे त्यांचा सन्मान राखणे आमचे कर्तव्य आहे. मुख्यमंत्री शिवसेनेचाच होणार आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले तर सरकारला एक चेहरा मिळेल. आम्ही तशी मागणी करू शकतो. पण, मुख्यमंत्रिपदाबद्दलचा अंतिम निर्णय उद्धव ठाकरे हेच घेतील.तो त्यांच्या पक्षाचा निर्णय असेल.” असं मलिक म्हणाले.

शिवसेनेच्या किशोरी पेडणेकर मुंबईच्या नव्या महापौर

तसेच, “शिवसेनेला भाजपकडून अडीच वर्षांच्या मुख्यमंत्रिपदाची ऑफर आल्याची चर्चा आहे. मुळात असं काही झालेलं नाही. सोशल मीडियातून हे पसरवलं जात आहे. खरंच तशी ऑफर भाजपकडून आली असेल, तर तो निर्णय शिवसेना घेईल. त्यासाठीही आमच्या शुभेच्छा असतील; पण असं काही होणार नाही.” असा दावा मलिक यांनी केला. दरम्यान महाराष्ट्रातला सत्तास्थापनेचा पेच सुटण्याच्या मार्गावर आहे. अखेर किमान समान कार्यक्रमावर एकमत झालं असून सत्तास्थापनेचा फॉर्म्युलाही ठरल्याचं सूत्रांनी म्हटलं.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार शिवसेनेला १५, राष्ट्रवादीला १५ आणि काँग्रेसला १२ मंत्रिपदं मिळणार आहेत. २१ तारखेला निवडणूक पार पडली आणि २४ ऑक्टोबर रोजी विधानसभा निवडणुकीचा निकाल लागला.

मात्र शिवसेनेने पहिल्या दिवसापासूनच आमच्यापुढे पर्याय खुले असल्याची भूमिका घेतली. ज्यामुळे सत्तास्थापनेचा पेच निर्माण झाला. त्यानंतर सुमारे १९ दिवसांनी महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू झाली. आता शिवसेना आघाडीच्या मदतीने सरकार स्थापन करण्याच्या तयारीत आहे.