राष्ट्रवादीचे संजय दौंड विधानपरिषदेवर, भाजप उमेदवाराची माघार

मुंबई : पुन्हा एकदा भाजपला निवडणुकीतून माघार घ्यावी लागली आहे. आता विधानपरिषद निवडणुकीत भाजपचे उमेदवार राजन तेली यांना आपली उमेदवारी मागे घ्यावी लागली आहे. दरम्यान, आमच्याकडे संख्याबळ नसल्याने ही उमेदवारी मागे घेतली असल्याचे भाजपकडून सांगण्यात आले आहे. त्यामुळे राष्ट्रवादीकडून काँग्रेसचे उमेदवार संजय दौंड विधानपरिषदेवर बिनविरोध निवडून आले आहेत.

राष्ट्रवादीचे नेते धनंजय मुंडे हे परळमधून विधानसभेवर  निवडून गेल्यामुळे त्यांच्या विधानपरिषद जागेवर ही निवडणूक झाली. या निवडणुकीसाठी भाजपकडून कोकणातील भाजप नेते राजन तेली उमेदवार होते तर राष्ट्रवादीकडून संजय दौंड यांना उमेदवारी दिली होती. त्यानुसार या निवडणुकीसाठी विधानसभेचे आमदार मतदान करणार होते. मात्र संख्याबळ नसल्याने भाजपने माघार घेतली.

राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये असलेले संजय दौंड यांनी अनेक वर्षे बीड जिल्हा परिषदेचे सदस्य होते. मात्र राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी विधानसभा निवडणुकीच्यावेळी त्यांना शब्द दिला होता, त्यामुळे आता त्यांना विधानपरिषदेवर संधी देण्यात आली. ते आता विधानपरिषदेचे आमदार म्हणून निवडून आले आहेत.