नागपुरात काँग्रेसची कोंडी, महापालिका निवडणूक राष्ट्रवादी स्वबळावर लढणार?

Sharad Pawar - Balasaheb Thorat

नागपूर : विधानसभा निवडणुकीनंतर अनपेक्षितपणे ऐतिहासिक समीकरण जुळल्याचे दिसून आले. २५ वर्षांपासून असलेली युती बाजूला सारून शिवसेनेनं भाजपपासून (BJP) फारकत घेत काँग्रेस (Congress) आणि राष्ट्रवादीशी (NCP) आघाडी केली. तसंच शिवसेनेचे (Shiv Sena) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या नेतृत्वाखाली राज्यात महाविकास आघाडीची सत्ता स्थापन करण्यात आली. राज्यात घडलेल्या या अनोख्या प्रयोगानंतर स्थानिक पातळीवरही हे तीनही पक्ष एकत्रच निवडणूक लढतील, अशी चर्चा सुरू होती. मात्र नागपूरमध्ये राष्ट्रवादीचे स्थानिक नेते काँग्रेसला धक्का देण्याचा तयारीत असून तसा निर्वाणीचा इशाराही दिला आहे.

नागपूर महापालिकाच्या (Nagpur Municipal Corporation) निवडणुका स्वबळावर लढण्याचा इशारा शहर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे देण्यात आला आहे. नागपूर शहरातील राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष अनिल अहिरकर यांनी याबाबत माहिती देत स्पष्ट केलं आहे, की महाविकास आघाडीच्या बॅनरवर जरी महापालिका निवडणुका आपण लढत असलो तरी सन्मानजनक जागा आपल्याला न मिळाल्यास राष्ट्रवादी काँग्रेस ‘एकला चलो रे’ या भूमिकेत दिसणार आहे.

महापालिका निवडणूक स्वबळावर लढण्याबाबत स्थानिक पातळीवर राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे तयारी जय्यत सुरू करण्यात आली आहे. राष्ट्रवादीचे नेते आणि गृहमंत्री अनिल देशमुख (Anil Deshmukh) व खासदार प्रफुल पटेल यांच्यासोबत झालेल्या बैठकीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष वाढविण्याचा दृष्टीने वरिष्ठ नेत्यांनी सूचना केली आहे. तसंच स्थानिक पातळीवर महापालिका निवडणुका स्वबळावर लढण्याची तयारी सुरू करण्याची तयारी देखील वरिष्ठांनी दाखवली आहे, अस दावा शहराध्यक्ष अनिल अहिरकर यांनी केला आहे.

दरम्यान, काही दिवसांपूर्वीच शिवसेना नेते संजय राऊत (Sanjay Raut) यांनी आगामी काळातील पालिका निवडणुकांत महाविकास आघाडीतील मित्रपक्ष एकत्रपणे लढतील, असं म्हटलं होतं. मात्र आता नागपूरमध्ये राष्ट्रवादीने घेतलेल्या भूमिकेमुळे महाविकास आघाडीच्या एकजुटीवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER