राष्ट्रवादीकडून राज्यपालांना संविधानाची प्रत भेट!

NCP

मुंबई : राज्यपाल भगतसिंह कोश्यारी (Governor Bhagat Singh Koshyari) यांनी मंदिरं  खुली करण्याच्या मुद्यावरून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांना पत्र पाठवले आहे. ‘हिंदुत्वाचा विसर पडून धर्मनिरपेक्ष झालात का?’ असा सवाल राज्यपालांनी उपस्थित केला. राज्यपाल यांनी मुख्यमंत्र्यांना पाठवलेल्या पत्राचा निषेध व्यक्त करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसनं खास गांधीगिरी दाखवलीय.

ठाणे राष्ट्रवादी काँग्रेसकडून राज्यपाल कोश्यारी यांना पोस्टाद्वारे संविधानाची प्रत पाठवण्यात आली आहे. राष्ट्रवादीचे ठाणे शहराध्यक्ष आनंद परांजपे यांच्या नेतृत्वाखाली आणि प्रदेश चिटणीस सुहास देसाई यांच्या उपस्थितीत ही गांधीगिरी करण्यात आली. शरद पवार यांनी पंतप्रधान मोदी यांना पत्र पाठवल्यानंतर आता राष्ट्रवादीचे लोकप्रतिनिधी आणि कार्यकर्तेही आक्रमक झालेत. ठाणे शहरातील मुख्य टपाल कार्यालयात दाखल होत आनंद परांजपे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी राज्यपालांना संविधानाची प्रत पाठवून दिली.

राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी यावेळी ‘संविधानाचा विजय असो’ अशी घोषणाबाजीही केली. भारतीय लोकशाही ही भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी संविधानातून दिली आहे. संविधानाच्या प्रास्ताविकेतील ‘धर्मनिरपेक्षता’ हा शब्द राज्यपालांना दाखवून देण्यासाठी संविधानाची प्रत सविनय पाठवत आहोत. भारत हे धर्माधिष्ठित  राष्ट्र नसून धर्मनिरपेक्ष आहे, हे सांगण्यासाठीच त्यांना संविधानाची प्रत आदरयुक्त पाठवत असल्याचं यावेळी आनंद परांजपे म्हणाले.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER