मुख्यमंत्रीपदाची ‘इच्छा’ जयंत पाटलांना भोवणार का? राष्ट्रवादीकडून स्पष्टीकरण

Jayant Patil

मुंबई: राष्ट्रवादीचे (NCP) प्रदेशाध्यक्ष तथा जलसंपदामंत्री जयंत पाटील (Jayant Patil) यांनी दोन दिवसांपूर्वी (बुधावार) मनातली मुख्यमंत्रिपदाची इच्छा बोलून दाखवली. जाहीरपणाने मुख्यमंत्रिपदाविषयी इच्छा व्यक्त केल्याने राजकीय वर्तुळात उलटसुलट चर्चा रंगल्या आहेत. या चर्चेवरून पाटील यांना प्रदेशाध्यक्षपदावरून दूर करणार असल्याचे वृत्त खोटे असल्याचे स्पष्टीकरण राष्ट्रवादी काँग्रेसकडून (NCP) देण्यात आले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते महेश तपासे यांनी यासंदर्भातील माहिती दिली. जयंत पाटील यांची प्रदेशाध्यक्षपदावरुन उचलबांगडी होणार असल्याचे वृत्त निराधार आहे. उलट लवकरच जयंत पाटील राज्यभरात दौरा करणार असल्याची तपासे यांनी दिली .

काही दिवसांपूर्वी जयंत पाटील यांनी मीदेखील मुख्यमंत्री होण्याचं स्वप्न पाहत असल्याचं वक्तव्यं केलं होतं. राजकीय वर्तुळात जयंत पाटील यांच्या वक्तव्याने मोठी खळबळ उडाली होती. त्यानंतर काही हिंदी प्रसारमाध्यांकडून शरद पवार यांनी जयंत पाटील यांना प्रदेशाध्यक्षपदावरुन दूर करण्याचे आदेश दिल्याचे वृत्त देण्यात आले होते. त्यामुळे राजकीय वर्तुळाच्या भुवया उंचावल्या गेल्या होत्या. मात्र, आता राष्ट्रवादीने जयंत पाटील हेच प्रदेशाध्यक्षपदी राहणार असल्याचे सांगत या चर्चेला पूर्णविराम दिले आहे .

दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील लवकरच राज्यव्यापी दौरा करणार आहेत. आगामी महानगरपालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पक्षाची संघटनात्मक बांधणी मजबुत करण्यासाठी हा दौरा आयोजित करण्यात आल्याचे सांगितले जाते. गडचिरोलीतल्या अहेरीपासून २८ तारखेला दौऱ्याला सुरुवात होईल. तर १३ तारखेला नंदूरबारमध्ये पहिल्या टप्प्याचा समारोप होईल. त्यानंतर जयंत पाटील मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र, कोकणच्या दौऱ्यावरही जातील.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजलाMT LIKE OUR PAGE FOOTER