राष्ट्रवादीकडून रोहिणी खडसेंना विधानसभेची उमेदवारी? पवारांमुळे शिवसेनेची कोंडी होणार

NCP nominates Rohini Khadse Possibility of Shiv Sena getting into trouble due to Pawar

जळगाव : मागच्या विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसने तुमचं केलेलं नुकसान पुढील विधानसभेला व्याजासकट भरुन काढू, असा शब्द देत प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांच्या कन्या रोहिणी खडसे (Rohini Khadse) – खेवलकर यांची उमेदवारीच जाहीर केली आहे.

रोहिणी खडसेंना मुक्ताईनगरमधून आमदारकी देण्याचे संकेतच एकप्रकारे राष्ट्रवादीने दिल्याचं चित्र आहे. तब्बल चार वर्ष आधीच मुक्ताईनगर विधानसभेच्या जागेसाठी उमेदवारी जाहीर करुन पक्ष बळकटीची रणनीती राष्ट्रवादीने आखल्याचे दिसून येत आहे. दुसरीकडे रोहिणी खडसेंना पराभूत करण्यासाठी ज्या आमदाराला शरद पवारांनी मदत केली आता त्याच शिवसेनेच्या सहयोगी आमदाराची चिंता वाढणार आहे. कारण शरद पवार रोहिणी खडसेंना विजयी करण्यासाठी कुठलीही कसर सोडणार नाही हे नक्की.

मात्र राष्ट्रवादीच्या या निर्णयामुळे मुक्ताईनगरचे शिवसेनेचे सहयोगी विद्यमान आमदार चंद्रकांत पाटील यांची चिंता वाढणार आहे. आमदार चंद्रकांत पाटील हे रोहिणी खडसे यांचा केवळ एक टक्का मताने पराभव करुन विजय झालेले आहेत. जयंत पाटील यांनी संवाद दौऱ्यानिमित्त मुक्ताईनगरची जागेवरएकप्रकारे दावाच ठोकला आहे. त्यामुळे पुढच्या विधानसभा निवडणुकीसाठी आतापासूनच राजकीय वातावरण तापायला सुरुवात होणार आहे.

मुक्ताईनगर हा खडसेंचा पारंपरिक मतदारसंघ आहे. एकनाथ खडसे विधानपरिषदेवर गेल्यास (राज्यपाल नियुक्त जागेसाठी मंजुरी मिळाल्यानंतर) रोहिणी खडसे मुक्ताईनगरातून वारसा चालवतील. त्यामुळे खडसे कुटुंब मुक्ताईनगरावरील दावा सोडणार नाहीत.

मुक्ताईनगरचे विद्यमान आमदार असलेले शिवसेनेचे सहयोगी चंद्रकांत पाटील हे रोहिणी खडसे खेवलकर यांचा एक टक्का मताने पराभव करुन विधानसभेत पोहोचले आहेत. त्यामुळे साहजिकच मुक्ताईनगरच्या जागेसाठी 2024 च्या निवडणुकीत ते आपल्या जागेचा दावा सोडणार नाहीत. मात्र एकनाथ खडसेंचे मतदारांवर असलेली पकड लक्षात घेता चंद्रकांत पाटील याना आगामी निवडणूक लढवणे कठीण जाणार हे नक्की.

दरम्यान, अपक्ष उमेदवार चंद्रकांत निंबा पाटील यांनी रोहिणी खडसेंना पराभूत केले होते. चंद्रकांत पाटील हे शिवसेनेत होते, परंतु 2019 च्या विधानसभा निवडणुकीत शिवसेना-भाजप युतीमध्ये लढल्यामुळे मतदारसंघ भाजपकडे गेला. त्यामुळे नाराज झालेल्या चंद्रकांत पाटलांनी शिवसेनेला रामराम ठोकत मुक्ताईनगरमधून भाजपविरोधात अपक्ष शड्डू ठोकला होता. त्यावेळी राष्ट्रवादीने चंद्रकांत पाटलांना पाठबळ दिलं होतं. खडसे कुटुंबाला पराभूत करण्यासाठी खुद्द राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवारही मुक्ताईनगरात भाषण देऊन आले होते. परिणामी रोहिणी खडसे पराभूत झाल्या, तर विधानसभेला विजय मिळवल्यानंतर चंद्रकांत पाटलांनी पुन्हा शिवसेनेलाच साथ दिली. मात्र राष्ट्रवादीने रोहिणी खडसेंना उमेदवारी दिली तर पुढची विधानसभा निवडणूक चंद्रकांत पाटील यांना अवघड जाणार आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER