ज्या डॉक्टरांसाठी टाळ्या, थाळ्या, शंखनाद केला, त्यांच्यावरच हल्ला का? डॉ. अमोल कोल्हे व्यथित

amol kolhe

पुणे: कोरोनाला देशातून हद्दपार करण्यासाठी भारत सरकार, संपूर्ण आरोग्य यंत्रणा अहोरात्र युद्धस्तरावर काम करत आहेत. मात्र, कोरोना या जीवघेण्या आजारातून रुग्णांना वाचविण्याचा प्रयत्न करणा-या डॉक्टरांवरच हल्ले होताना पाहून मन व्यथित झाल्याचे अमोल कोल्हे यांनी म्हटले आहे. तसेच, अमोल कोल्हे यांनी हल्लेखोरांविरुद्ध संतापदेखील व्यक्त केला आहे. आठ दिवसांपूर्वी आपण ज्या डॉक्टर आणि आरोग्य कर्मचाऱ्यांसाठी टाळ्या, थाळ्या, शंखनाद केला. त्याच डॉक्टरांवर आता हल्ला होतोय. आठ दिवसात हल्ला होण्याइतकं असं काय घडलं? त्यामुळे आपण जबाबदार नागरिक आहात का? असा प्रश्न पडल्याचं खासदार अमोल कोल्हे यांनी म्हटलं आहे.

‘या कठीण काळात सर्व डॉक्टर, पोलीस, सफाई कर्मचारी आणि प्रशासन जीवाची बाजी लावत आहे. स्वतःचा आणि कुटुंबाचा जीव धोक्यात घालून ते रुग्णसेवा करत आहे. त्यांना सहकार्य करण्याचं औदार्य आपल्यात नाही का?’ असा सवाल खासदार कोल्हे यांनी केला.

भारत पाकिस्तानची मॅच असेल किंवा दहशतवादी हल्ल्या अशावेळी आपलं देशप्रेम उफाळून येतं. मग आता तर देशात युद्धजन्य स्थिती आहे, आताच्या परिस्थितीत ‘कोरोना’ विरुद्ध लढाई ही देशसेवा आहे, आपलं देशप्रेम आताही कायम असू द्या असंही अमोल कोल्हे म्हणाले.

तसेच, सर्वधर्मीय धर्मगुरु, मौलवींना एकच सांगणं आहे की तुम्ही आपल्या अनुयायांना सांगा. देव मंदिरात नाही, अल्ला मशिदीमध्ये नाही, येशू चर्चमध्ये नाही, तो गुरुद्वारामध्ये नाही, तर ते सर्व डॉक्टर, पोलिस प्रशासन आणि या रुग्णांची सेवा करणाऱ्या, ‘कोरोना’ विरुद्ध लढणाऱ्या कर्मचाऱ्यांमध्ये एकवटले आहेत, असंही अमोल कोल्हे यांनी म्हटलं.