शिवसेनेकडून राष्ट्रवादीला मोठा धक्का बसण्याची शक्यता; संग्राम जगताप शिवसेनेच्या वाटेवर?

Sangram Jagtap

अहमदनगर : आगामी विधानसभा निवडणुकीपूर्वी शिवसेनेकडून राष्ट्रवादीला पुन्हा मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे. अहमदनगरचे राष्ट्रवादीचे आमदार संग्राम जगताप शिवसेनेत प्रवेश करण्याची शक्यता वर्तवली आहे. विधानसभा निवडणुकीत आपला विजय पक्का करण्यासाठी संग्राम जगताप शिवसेनेत प्रवेश करणार असल्याची चर्चा जिल्ह्यात रंगू लागली आहे.

लोकसभा निवडणुकीत नगर दक्षिण मतदारसंघ राष्ट्रवादीने प्रतिष्ठेचा करत या मतदारसंघात संग्राम जगताप यांना तिकीट दिलं होतं; पण आता हेच संग्राम जगताप शिवसेनेच्या वाटेवर असल्याने राष्ट्रवादीसमोर मोठा पेच निर्माण झाला आहे. विधानसभा निवडणुकीपूर्वी आमदार जगताप शिवसेनेत प्रवेश करू शकतात. याबाबत ‘हिंदुस्तान टाइम्स’ या इंग्रजी दैनिकाने वृत्त दिलं आहे. संग्राम जगताप हे शिवसेनेत प्रवेश करणार असल्याची चर्चा सुरू झाली असताना स्वत: जगताप यांनी मात्र या चर्चा फेटाळून लावल्या आहेत.

ही बातमी पण वाचा : जमिनीच्या वादातील सशस्त्र संघर्षात १० जणांचा मृत्यू, १८ जखमी

मी राष्ट्रवादीसोबत असून माझा शिवसेना प्रवेश या केवळ अफवा आहेत, असा दावा जगताप यांनी केला आहे. दरम्यान, अहमदनगरची लोकसभेची जागा भाजपचे उमेदवार डॉ. सुजय विखे पाटील यांनी तबल २ लाख ८१ हजार ४७४ मताधिक्क्याने काबीज केली. या लोकसभा मतदारसंघातील सहा विधानसभेच्या जागांमध्ये डॉ. सुजय विखे यांनी आघाडी घेतली. संग्राम जगताप हे नगर शहराचे आमदार असूनही या विधानसभा मतदारसंघात सुजय विखेंनी ५३ हजार १२२ मतांनी आघाडी घेतली होती. याच कारणामुळे संग्राम जगताप हे पीछाडीवर गेले होते. म्हणूनच ते आता शिवसेना प्रवेशाचा विचार करत असल्याचे बोलले जात आहे.

ही बातमी पण वाचा : शिवसेनेचे आंदोलन म्हणजे विधानसभेसाठीची नौटंकी – राष्ट्रवादी