राष्ट्रवादीला धक्का ; आमदार रामराव वडकुते भाजपच्या वाटेवर

मुंबई :- राष्ट्रवादी काँग्रेसचे विधान परिषद सदस्य आमदार रामराव वडकुते मंगळवारी भाजपात प्रवेश करणार असल्याची माहिती समोर आली आहे . राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये अल्पसंख्याकांना सन्मानाची वागणूक मिळत नसल्याचा आरोप त्यांनी केला आहे. ऐन निवडणुकीच्या तोंडावर राष्ट्रवादी काँग्रेससाठी हा मोठा धक्का मानला जातो.

राष्ट्रवादीचे विधान परिषद सदस्य आमदार रामराव वडकुते यांनी हिंगोली विधानसभा मतदारसंघात उमेदवारी मिळावी यासाठी प्रयत्न केले होते . मात्र त्यांना उमेदवारी न मिळाल्याने पक्षावर नाराज होते . या नाराजीतून ते १५ ऑक्टोबर रोजी भाजपात प्रवेश करणार आहेत. त्यांचे पुत्र शशिकांत वडकुते यांनी या वृत्ताला दुजोरा दिला आहे.

दरम्यान अलीकडेच भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्याबरोबर त्यांचे एक छायाचित्र समाजमाध्यमातून पाहायला मिळाले होते. त्यानंतर त्यांच्या भाजप प्रवेशाच्या चर्चा राजकीय वर्तुळात सुरु झाल्या होत्या.

ही बातमी पण वाचा : भाजपात आलेले काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसमधील नेते सर्व चांगले : जावडेकर