राष्ट्रवादीचे ज्येष्ठ आमदार लवकरच भाजपप्रवेश करणार ?

BJP-NCP

सोलापूर : विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर राष्ट्रवादी कॉंग्रेसला लागलेली गळती सुरूच आहे. आता माढ्याचे राष्ट्रवादी कॉंग्रेस आमदार बबन शिंदे यांनी कार्यकर्त्यांची बैठक बोलवली. शिंदे हे तालुक्यातील कार्यकर्त्यांशी चर्चा करून राष्ट्रवादीला रामराम करून भाजपप्रवेश करणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

शिंदे यांनी काही दिवसांपूर्वी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली होती. भाजपाध्यक्ष अमित शहा यांच्या उपस्थितीत सोलापूर येथे त्यांचा प्रवेश होणार असल्याची चर्चा होती. मात्र काही कारणांमुळे त्यांचा प्रवेश थांबला होता.

बबन शिंदे हे राष्ट्रवादी कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते आहेत. त्यांचे बंधू संजय शिंदे यांनी राष्ट्रवादीकडून लोकसभा निवडणूक लढवली होती. भाजपच्या रणजितसिंह निंबाळकर यांनी त्यांचा पराभव केला. शिंदेबंधू यांनी मध्यंतरी पूरग्रस्तांना निधी देण्याच्या निमित्ताने मुख्यमंत्र्यांची भेट घेतली होती. त्यानंतरच त्याच्या भाजपप्रवेशाच्या चर्चा सुरू झाल्या होत्या. दरम्यान गेल्या काही दिवसांपूर्वी विधानसभेचे तत्कालीन विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. तसेच आताही कॉंग्रेस आणि भाजपचे अनेक नेते भाजप आणि सेनेच्या वाटेवर आहेत. त्यामुळे येणाऱ्या विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या अडचणी वाढणार आहेत. ऐन निवडणुकीच्या तोंडावर भाजप –सेना युतीची ताकद वाढत आहे. तर काँग्रेस -राष्ट्रवादी कमकुवत होताना दिसत आहे.