कोरोना काळातही पवारांसह राष्ट्रवादीचे मंत्री ‘ऑन फिल्ड’; जिगाव प्रकल्पासाठी राज्यपालांकडे निधी मागणार

मुंबई :  कोरोनाचे संकट राज्यात गडद असले तरी, शरद पवार (Sharad Pawar), अजित पवार (Ajit Pawar) ते जयंत पाटील असे सर्वच दिग्गज मंत्री ऑन फिल्ड (On Field) काम करताना दिसतात. मुंबईच्या मुसळधार पावसातही राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी यशवंतराव चव्हाण सेंटरमध्ये राष्ट्रवादीच्या मंत्र्यांची बैठक घेतली. उपमुख्यमंत्री अजित पवारदेखील कोरोनाच्या पार्श्वभूमिवर आढावा घेण्यासाठी, उपाययोजनांसंदर्भात बैठका घेताना दिसतात. राज्याचे जलसंपदा मंत्री जयंत पाटील (Jayant patil) यांनीही गुरूवारी मंत्रालयात बैठक घेतली आमि राज्याच्या जलस्त्रोताविषयीचा आढावा घेऊन जिगावच्या प्रकल्पाकडे प्रामुख्याने लक्ष देणार असल्याचे त्यांनी सांगितले.

जिगाव प्रकल्पासाठी विशेष तरतूद म्हणून राज्यपालांकडे पुढील तीन वर्षांसाठी चार हजार कोटी रुपयांचा निधी मागणार तसेच दोन वर्षात या प्रकल्पासाठी निधी उपलब्ध करून प्रकल्पाचा पहिला टप्पा पूर्ण केला जाईल असा विश्वास जयंत पाटील यांनी बेठकीत दिला.

जलसंपदामंत्री जयंत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालय येथे अन्न व औषध प्रशासन मंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे यांच्या प्रमुख उपस्थितीत यासंदर्भात एक बैठक संपन्न झाली. त्यावेळी हा निर्णय घेण्यात आला.

जिगाव (ता.नांदुरा जि.बुलढाणा) प्रकल्पाच्या उर्वरित किंमतीमध्ये मुख्यतः भूसंपादन व पुनर्वसनाची किंमत असून त्यासाठी सुमारे चार हजार कोटी रुपयांचा निधी लागणार आहे. याकरिता राज्यपाल महोदयांच्या निधी वाटपाच्या सूत्रांमध्ये बदल करून जिगाव प्रकल्पासाठी विशेष तरतूद म्हणून येत्या तीन वर्षात चार हजार कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून द्यावा यासाठी राज्यपाल महोदयांना जलसंपदा मंत्री यांच्या स्वाक्षरीने निवेदन देण्यात येईल.

तसेच जिगाव (ता.नांदुरा जि.बुलढाणा) प्रकल्प अंशतः पाणीसाठा करण्याबाबत देखील चर्चा झाली. यानुसार जलसंपदा विभाग अमरावतीचे मुख्य अभियंता यांनी अंशत: पाणीसाठा करण्यासाठी नदीपात्रात द्वारयुक्त अतिरिक्त सांडवा देणे गरजेचे असून याबाबतचा प्रस्ताव शासनाकडे सादर करावा असे निर्देश देण्यात आले.

पुनर्वसन, गावठाण नागरी सुविधांची कामे करताना ही कामे दर्जेदार व्हावीत व पुनर्वसन आदर्श ठरावे असे पहावे. याबाबतही मुख्य अभियंता यांनी वेगवेगळ्या प्रकारचे डिझाईन वास्तुविशारदांकडून तयार करून घेऊन ती सादर करावीत असे निर्देश देण्यात आले. तसेच जिगाव प्रकल्पाचे अतिरिक्त सांडव्याबाबत मराठी व हिंदी या दोन्ही भाषेत चित्रफित तयार करावी, असे निर्देशही जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी दिले.

ह्या बातम्या पण वाचा : 

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER