खडसेंच्या स्वागतासाठी राष्ट्रवादीचे नेते उताविळ; जळगाव जिल्हा राष्ट्रवादीत बदलाचे वारे!

Eknath Khadse-NCP

जळगाव :  भाजपचे नाराज नेते एकनाथ खडसे (Eknath Khadse) राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षात प्रवेश करणार असल्याची जोरदार चर्चा गेल्या काही दिवसांपासून सुरू आहे. त्याला राष्ट्रवादीचे बडे नेते दुजोराही देत आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते व माजी मंत्री गुलाबराव देवकर (Gulabrao Deokar) यांनी एकनाथ खडसे यांच्या राष्ट्रवादी प्रवेशाचे संकेत आज जळगावात पत्रकारांशी बोलताना दिले. ‘एकनाथ खडसेंच्या राष्ट्रवादी प्रवेशाविषयी आमच्या पक्षाचे वरिष्ठ नेते निर्णय घेतील. नेत्यांचा निर्णय आम्हाला मान्य असेल. आम्ही एकनाथ खडसे यांचे पक्षात स्वागतच करू’, अशी प्रतिक्रिया गुलाबराव देवकर यांनी दिली आहे.

तर, राज्याचे आरोग्यमंत्री व राष्ट्रवादीचे (NCP) नेते राजेश टोपे (Rajesh Tope) यांनीही एकनाथ खडसे यांच्याबाबत नगरमध्ये पत्रकारांशी बोलताना सकारात्मक विधान केले होते. राष्ट्रवादीमध्ये योग्य लोकांचे नेहमीच स्वागत केले जाते. आमचा पक्ष कर्तव्यवान माणसाला स्वीकारत असतो. त्यादृष्टीकोनातून पक्षात कोणी येऊ इच्छित असतील तर राष्ट्रवादीच्या नेते मंडळींनी अशा चांगल्या लोकांना वाट करून द्यावी असे मला वाटते, असे राजेश टोपे म्हणाले होते. टोपे यांच्यानंतर आता गुलाबराव देवकर यांनीही खडसेंच्या राष्ट्रवादी प्रवेशास पाठिंबा दिल्याने चर्चा सकारात्मक मार्गाने असल्याचे संकेत दिले आहेत.

एवढेच नाही तर, एकनाथ खडसे यांच्या राष्ट्रवादी प्रवेशाच्या अनुषंगाने जळगाव जिल्ह्यात राष्ट्रवादीच्या स्थानिक पक्ष संघटनेत फेरबदल होणार असल्याची सध्या जोरदार चर्चा आहे. याबाबत पत्रकारांनी गुलाबराव देवकर यांना विचारणा केली असता, त्याबाबत मात्र त्यांनी कानावर हात ठेवले. पक्ष संघटनेत फेरबदल होणार, याबाबत काहीही हालचाली सुरू नाहीत. अशी बातमी माध्यमांमधूनच मला समजली. पण तसे काहीही नाही. सध्या जिल्ह्यातील पक्षसंघटनेचे उत्तम काम सुरू आहे. त्यामुळे फेरबदलाचा विषयच नाही, असे गुलाबराव देवकर म्हणाले.

दरम्यान, वरिष्ठ नेत्यांनी खडसेंबाबत सकारात्मक भूमिका घेतली तर आमचा त्याला पाठिंबा असेल. खडसेंच्या प्रवेशामुळे पक्षाला फायदा होणार असेल, पक्षसंघटन मजबूत होत असेल तर चांगलेच आहे. आम्ही खडसेंचे पक्षात स्वागतच करू’, ‘भाजप नेते एकनाथ खडसे यांच्या राष्ट्रवादी प्रवेशाबाबत पक्षाचे अध्यक्ष शरद पवार, उपमुख्यमंत्री अजित पवार तसेच प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील हे नेते निर्णय घेतील. असे देवकर यांनी सांगितले.

ही बातमी पण वाचा : मनसे आणि शिवसेनेत मध्यरात्री गुप्त बैठक ; उलट -सुलट चर्चांना उधाण

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER