राष्ट्रवादी काँग्रेसला धक्का ; शिंदे बंधू भाजपाच्या वाटेवर ?

- शरद पवारांकडे दुर्लक्ष करत पूरग्रस्त मदत निधी स्वतः केला मुख्यमंत्र्यांचा स्वाधीन

Sharad Pawar-sanjay-shinde-babandada-shinde-cm fadnavis

सोलापूर : राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा परिषद अध्यक्ष संजयमामा शिंदे आणि माढ्याचे राष्ट्रवादीचे आमदार बबनदादा शिंदे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतल्याने राजकीय वर्तुळात उलट -सुलट चर्चा सुरु झाल्या आहेत. ऐन विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर दोन्ही शिंदे बंधू भाजपच्या वाटेवर असल्याचे बोलल्या जात आहे.

गेल्या काही दिवसांपासून संजय शिंदे आणि बबनदादा शिंदे यांची राष्ट्रवादी काँग्रेससोबत खटके उडत असल्याची माहिती समोर आली आहे . सांगली-कोल्हापूर पूरग्रस्तांच्या पुनर्वसन कार्यासाठी संपूर्ण महाराष्ट्रातून मदतीचा ओघ सुरू असतानाच दोन्ही शिंदे बंधूंनी पूरग्रस्तांना राष्ट्रवादी काँग्रेसच्या माध्यमातून मदत न करता त्यासाठी त्यांनी थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस याचीच भेट घेतली.

राष्ट्रवादी काँग्रेसकडून माढा लोकसभा मतदारसंघात निवडणूक लढवलेले संजयमामा यांनी 11 लाख तर माढा विधानसभेचे आमदार बबन शिंदे यांनी 10 लाख रुपये पूरग्रस्तांसाठी मुख्यमंत्री सहाय्तता निधी देवेंद्र फडणवीस यांच्याकडेच सुपूर्द केला. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार स्वत: पूरग्रस्तांसाठी सांगली-कोल्हापुर मध्ये तळ ठोकून असताना शिंदे बंधूंनी मुख्यमंत्राकडे जाऊन मदतनिधी देण्याचा मार्ग स्वीकारल्याने येत्या विधासभा निवडणुकीच्या तोंडावर ते राष्ट्रवादीला रामराम ठोकणार असल्याच्या चर्चा आहेत . कारण लोकसभा निवडणूकीनंतर दोन्ही शिंदे बंधू राष्ट्रवादी काँग्रेसपासून अंतर ठेवून आहेत.