स्वप्नातले सत्यात आजपर्यंत फक्त पवार कुटुंबाने उतरवले आहे; रूपाली चाकणकरांचे चंद्रकांतदादांना प्रत्युत्तर

मुंबई : “स्वप्नातले  सत्यात आजपर्यंत फक्त पवार कुटुंबाने उतरवले आहे. चंद्रकांतदादा, अजून काही स्वप्नं आहेत, ती साकार होताना तुम्हाला पाहायची आहेत.” अशा शब्दांत राष्ट्रवादीच्या महिला प्रदेशाध्यक्ष रूपाली चाकणकर (Rupali Chakankar) यांनी भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांच्यावर निशाणा साधला. राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) स्वप्नात आहेत का, या चंद्रकांत पाटलांच्या वक्तव्याचा चाकणकरांनी आपल्या फेसबुक पोस्टच्या माध्यमातून समाचार घेतला.

रूपाली चाकणकर यांची फेसबुक पोस्ट :
चंद्रकांत पाटील यांनी सुप्रिया सुळे स्वप्नात आहेत का, असे मत व्यक्त केले. एक गोष्ट त्यांनी लक्षात घ्यायला पाहिजे, स्वप्नातले सत्यात आजपर्यंत फक्त पवार कुटुंबाने उतरवले आहे. नाही तर कशाला १०५ आमदार घेऊन घरी बसावं लागलं असतं? त्यामुळे एक गोष्ट त्यांनी लक्षात घ्यावी, अशक्य ते शक्य करून दाखवले त्याला एक वर्ष झाले. अजून काही स्वप्नं आहेत ती  साकार होताना चंद्रकांतदादा तुम्हाला पाहायची आहेत. आपली वैफल्यग्रस्त, नैराश्यजनक मानसिकता आम्ही समजू शकतो.

आपणच सत्तेत येण्याची दिवास्वप्नं पाहायची सोडून विरोधात आहोत हे सत्य स्वीकारावे, असा सल्ला रूपाली चाकणकर यांनी फेसबुक पोस्टच्या माध्यमातून दिला. दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी राज्य सरकारचं कौतुक करण्यासाठी पुण्यात येत आहेत, असे सुप्रिया सुळे म्हणाल्या होत्या. त्या स्वप्नात आहेत का? असा खोचक सवाल चंद्रकांत पाटील यांनी विचारला होता. राज्य सरकार अपयशी ठरले आहे. गोंधळलेले आहे. सरकारमध्ये समन्वय नाही. आरक्षण असो किंवा इतर विषय, हे सरकार कशाबद्दलच खात्री देत नाही, असेही चंद्रकांत पाटील म्हणाले होते.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER