कोरोना इफेक्ट : शरद पवारांच्या आदेशाने राष्ट्रवादीच्या सर्व जाहीर सभा, बैठका रद्द – नवाब मलिक

Sharad Pawar - Nawab Malik

मुंबई : कोरोना व्हायरसने भारतात, महाराष्ट्रातही शिरकाव केला आहे. महाराष्ट्रात आता एकूण ११ कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले आहेत. पुणे-मुंबईपाठोपाठ आता राज्याची उपराजधानी नागपुरातही एक कोरोनाबाधित रुग्ण आढळून आला आहे. त्या रुग्णावर नागपूरच्या मेयो या सरकारी दवाखान्यात उपचार सुरू आहे.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र सरकारने नागरिकांना खबरदारी घेण्याचे आवाहन केले आहे. तर राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाने सगळे जाहीर कार्यक्रम, बैठका रद्द केल्या आहेत आणि सर्वांनीच कोरोना व्हायरसच्या संसर्गापासून वचावासाठी योग्य ती काळजी घेण्याचे आवाहन राष्ट्रवादीने केले आहे.

कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी जनतेनेही सरकारने केलेल्या सूचनांचे पालन केले पाहिजे. गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळले पाहिजे, असे राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी सांगितले आहे. नवाब मलिक हे एनपीआर संदर्भात माध्यमांशी बोलत होते. एनपीआरला राष्ट्रवादी कॉंग्रेसचा विरोध असल्याचे मलिक यांनी ठामपणे सांगितले.

नवाब मलिक म्हणाले –
काल पक्षाध्यक्ष शरद पवार यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली. आम्ही निर्णय घेतला आहे की, २०२० च्या राष्ट्रीय लोकसंख्या नोंदणीस पाठिंबा देणार नाही. महाविकास आघाडीचा मंत्री समितीचा सदस्य असल्याने मला पक्षाला काय हवे आहे ते समजले आहे आणि आम्ही एकत्र बसून मंत्रिमंडळाला अहवाल सादर करू आणि ते याबाबत निर्णय घेतील, असे मलिक यांनी सांगितले. याचवेळी त्यांनी कोरोनासंबंधीही राष्ट्रवादीची भूमिका मांडताना सर्व जाहीर कार्यक्रम, बैठका राष्ट्रवादीने रद्द केल्याचे मलिक यांनी आवर्जून सांगितले. नागरिकांनाही सतर्क राहण्याचे आवाहन केले.