भारतीय राजकारणातील तथाकथित चाणक्याला शरद पवारांनी मात दिली- नवाब मलिक

मुंबई : शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसच्या या पक्षांचं मिळून महाविकास आघाडी सरकार राज्यात येणार असल्याचं तिन्ही पक्षांचे नेते सांगत आहेत. दरम्यान, भाजपला सत्तेपासून दूर ठेवल्याच्या मुद्यावरून राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी भाजपाध्यक्ष अमित शहा यांना टोला लगावला आहे.

मलिक यांनी राज्यात सर्वाधिक जागा मिळूनही भाजप सत्तेबाहेर झाल्याच्या मुद्यावरून भाजपाध्यक्ष अमित शहा यांना डिवचलं आहे. “अखेर भारतीय राजकारणातील तथाकथित चाणक्याला शरद पवार यांनी मात दिलीच. दिल्लीचं तख्त महाराष्ट्राला झुकवू शकलं नाही. ” अशी कोपरखळी मलिक यांनी ट्विटरवरून लगावली आहे.

दरम्यान महाराष्ट्रात शिवसेना-काँग्रेस-राष्ट्रवादी या तिघांची आघाडी करून सरकार स्थापन करण्याबाबत सुरू असलेली चर्चा अंतिम टप्प्यात आल्याचे दिल्लीतून जाहीर झाले. आज (शुक्रवारी) मुंबईत शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांची एक बैठक होणार आहे. त्यानंतर ‘महाविकास आघाडी’विषयी अधिकृत घोषणा होण्याची शक्यता आहे.

शिवसेनेचं “रिमोट कंट्रोल” आपल्या हाती घेण्यात शरद पवार यशस्वी !