राष्ट्रवादीचे नेते मेहबूब शेख यांच्यावर बलात्काराचा आरोप करणारी तरुणी गायब

Mehboob Shaikh

औरंगाबाद : राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे (NCP) प्रदेशाध्यक्ष मेहबूब शेख (Mehboob Shaikh) यांच्याविरोधात बलात्काराची तक्रार देणारी तरुणी गायब झाली आहे. तरुणीच्या अचानक गायब होण्याने औरंगाबादच्या राजकारणात खळबळ उडाली आहे. ही तरुणी नॉट रिचेबल असल्‍याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. सध्या संपूर्ण यंत्रणा या तरुणीचा शोध घेत आहे.

दरम्यान या तरणीच्या गंभीर आरोपानंतर मेहबूब शेख यांनी सर्व आरोप फेटाळले होते. याबबात खुलासा करताना शेख यांनी सांगितले होते की, “औरंगाबादमधील सिडको पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाल्याची माहिती मला पत्रकार मित्राकडून मिळाली. त्यानंतर मी पोलीस अधिकाऱ्यांशी बोललो आणि फिर्यादीच्या म्हणण्याप्रमाणे मेहबूब इब्राहिम शेख या व्यक्तीचा शोध घेण्याची मागणी केली. मी कधीही संबंधित तरुणीला प्रत्यक्ष भेटलो नाही किंवा फोनवरही बोललेलो नाही. मी 10 आणि 11 तारखेला मुंबईत होतो. माझे मुंबईत कार्यक्रम होते. 14 नोव्हेंबरला मी बीड जिल्ह्यातील शिरुर कासार या माझ्या गावाकडे होतो. पोलिसांना सर्व पुरावे तसंच माहिती देण्यास मी तयार आहे. या प्रकरणामागे कोण आहे?, याचा पोलिसांनी शोध घ्यावा”.

मेहबूब शेख यांनी त्यांच्या फेसबुक अकाऊंटवर याबाबत एक व्हिडीओ शेअर करत संबंधित तरुणीने केलेले सगळे आरोप फेटाळून लावले. “संबंधित तरुणीशी माझा कसलाही संबंध नाही. मी तिला कधीही पाहिलं नाही किंवा भेटलेलो नाही. एखाद्या व्यक्तीने एवढ्या मेहतीने उभं केलेलं राजकीय आयुष्य इतक्या घाणेरड्या आरोपांनी उध्वस्त करु नये. यामागे कुणाचं षडयंत्र आहे?, या प्रकरणामागे कोण राजकीय लोकं आहेत?, त्या महिलेचा बोलविता धनी कोण आहे?, याची पोलिसांनी कसून चौकशी करावी. गरज पडली तर माझी नार्को टेस्टचीही तयारी आहे आणि जर आरोप सिद्ध झाले तर मी फासावर जायला तयार आहे”, असं मेहबूब यांनी फेसबुक व्हिडीओ शेअर करत म्हटलं होतं.

तसेच, तक्रार दाखल झाल्यानंतर पोलिसांनीही चौकशीत मेहबूब शेख यांच्या बाजूने खुलासा केला होता.

पोलीस काय म्हणाले –

मागील 1 वर्षात मेहबूब शेख यांचा तरुणीशी कुठलाही संपर्क झालेला नसल्याची माहिती समोर आलीय. तांत्रिक पुराव्यांच्या आधारे मागील 1 वर्षात आरोपी आणि फिर्यादी संपर्कात नसल्याचा खुलासा पोलीस उपायुक्त दीपक गिर्हे यांनी केलाय.

औरंगाबाद पोलिसांनी मेहबूब शेख यांच्यावर झालेल्या आरोपांचा तपास करण्यासाठी 3 पथकं तयार केली आहेत. सहाय्यक पोलीस आयुक्तांच्या नेतृत्वाखाली या गुन्ह्याचा सखोल तपास सुरु आहे.

आमदार रोहित पवार (Rohit Pawar) सुद्धा मेहबूब शेकसाठी मैदानात उतरले होते. मागील 1 वर्षात मेहबूब शेख यांचा तरुणीशी कुठलाही संपर्क झालेला नसल्याची माहिती पोलिसांनीच समोर आणलीय. त्यामुळे विरोधकांनी याप्रकरणाचा राजकीय फायदा घेऊ नये, अशा शब्दात रोहित पवार यांनी भाजपला (BJP) सुनावलं होतं.

प्रत्येक पीडित महिलेच्या बाजूने आम्ही नेहमीच उभं असतो आणि कुणी चुकत असेल तर त्यावर कारवाईही झालीच पाहिजे; पण महेबूब शेख व संबंधित तरुणीचा वर्षभर संपर्क नसल्याचा खुलासा पोलिसांनीच केलाय. त्यामुळं विरोधकांनी या प्रकरणाचा राजकीय फायदा घेण्याचा प्रयत्न करु नये, असं ट्विट रोहित पवार यांनी केलं होतं.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER