होय, शरद पवार हे ‘जाणता राजा’ आहेत; उदयनराजेंवर आव्हाडांचा पलटवार

Udayanraje-Jitendra Awhad

मुंबई :- शरद पवारांची ‘जाणता राजा’ नावाने तुलना केली जात असे. यावर उदयनराजेंनी आक्षेप घेतला आहे. उदयनराजेंनी नाव न घेता टीका केली आहे. जाणता राजा ही उपमा कुणी दिली? असा सवाल उदयनराजेंनी पत्रकार परिषदेत विचारला आहे. कुणालाही जाणता राजा म्हणतात, असा राग उदयनराजेंनी पत्रकार परिषदेत व्यक्त केला. तर ‘जाणता राजा फक्त शिवाजी महाराजच आहेत. तसेच कुणाशीही महाराजांची तुलना होऊ शकत नाही.’ अशा कडक शब्दांत उदयनराजे भोसलेंनी टीका केली आहे.

उदयनराजेंच्या या टीकेचा आता राष्ट्रवादीचे नेते आणि माजी मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी समाचार घेतला आहे.

ही बातमी पण वाचा : जाणता राजा म्हणून महाराजांच्या नावाने राजकारण नको, उदयनराजेंचा पवारांना टोला

‘होय शरद पवार हे जाणता राजा आहेत. हाताच्या तळव्यावर महाराष्ट्राचा अभ्यास असणारा नेता म्हणजे शरद पवार. इथल्या ग्रामीण अर्थव्यवस्थेचा प्रश्न, इथल्या औद्योगिक वसाहतीचे प्रश्न, शेतकऱ्यांचे प्रश्न, शेतमजुरांचे प्रश्न, स्त्रियांचे प्रश्न…प्रश्नांची मालिका सांगा. सगळ्या प्रश्नांची उत्तरे शरद पवारांकडेच आहेत. म्हणून शरद पवार हे जाणता राजा आहेतच.’ असं म्हणत जितेंद्र आव्हाड यांनी उदयनराजे भोसले यांना प्रत्युत्तर दिलं आहे.

‘महिलांना ३० टक्के आरक्षण, कोकण रेल्वे, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचं मराठवाडा विद्यापीठाला नाव, जेएनपीटी…असे किती प्रकल्प सांगू…त्यामुळे गेल्या ६० वर्षांत महाराष्ट्राच्या सर्वांगीण विकासात सर्वाधिक योगदान हे शरद पवार यांचंच आहे.’ असंही जितेंद्र आव्हाड म्हणाले.