…अन् रेल्वे ट्रॅकजवळ सोडून दिलेल्या मुलीचं धनंजय मुंडे यांनी स्वीकारलं पालकत्व

Dhananjay Munde

बीड : समाजात विविध मानसिकतेचे लोक वावरत असतात. प्रेम दया, माया, जिव्हाळा, माणुसकी दाखवत एकमेकांच्या जीवाला जीव देणारा वर्गही इथेच आहे तर दुसरीकडे संवेदनशीलता हरवत चाललेला, अमानुष समाजही येथेच आढळून येतो.

एकीकडे मुलीला लक्ष्मी, सरस्वती, दुर्गा म्हणून तिची मूर्तिरूपात पूजा करतात तर दुसरीकडे याच समाजात नकोशी म्हणून स्त्रीभ्रूणहत्या करणारा वर्गही येथे दिसतो. यामुळेच अनेकदा मुलीला कचऱ्याच्या पेटीजवळ किंवा निर्जन ठिकाणी एकटं सोडून आई-बाप निघून गेल्याचे प्रकार समोर येतात. म्हणूनच अनेक ठिकाणी अशा अपत्यांसाठी पाळणाघरं, अनाथ आश्रमांची संख्या कमी न होता वाढत चाललेली दिसून येते. तसेच, अनेकदा जागरूक नागरिकांमुळे अशा नकोशा मुलींचे प्राण वाचतात, तर काही वेळा त्यांना प्राणाला मुकावं लागतं.

असेच एक स्त्रीभ्रूण काटेरी झुडपात पडून होते. रेल्वे-ट्रॅकजवळ काटेरी झुडपात मुलीला सोडून कोणी तरी पळ काढला. पालकमंत्री धनंजय मुंडे यांना ही गोष्ट समजताच त्यांनी तत्काळ या मुलीला वैद्यकीय उपचारांसाठी दवाखान्यात दाखलं केलं. इतकंच नव्हे तर धनंजय मुंडेंनी या मुलीचं पालकत्व स्वीकारलं असून तिच्या शिक्षणासह लग्नापर्यंतची सर्व जबाबदारी खासदार सुप्रिया सुळे आणि धनंजय मुंडे यांनी स्वीकारली आहे. धनंजय मुंडेंनी या मुलीचं नाव ‘शिवकन्या’ असं ठेवलं आहे.