मोदींनी पवार कुटुंबाची काळजी करू नये : धनंजय मुंडे

ncp-leader-dhananjay-munde-slams-pm-narendra-modi

मुंबई : आगमी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये कौटुंबिक लढाई सुरु असल्याचे चित्र दिसत आहे. शरद पवारांचे पुतणे राष्ट्रवादीवर वर्चस्व मिळवण्याचा प्रयत्न करत आहे.अजित पवारांच्या हातून शरद पवार हिट विकेट झाले आहेत, अशी टीका पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राष्ट्रवादी काँग्रेसवर केली आहे . मोदींच्या टीकेला आता राष्ट्रवादीचे नेते धनंजय मुंडे यांनी उत्तर दिले आहे.शरद पवार यांच्या कुटुंबाची आणि राष्ट्रवादीची काळजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी करू नये , असे ते म्हणाले .

ही बातमी पण वाचा :- अजित पवारांकडून शरद पवार हिटविकेट झाले आहेत – नरेंद्र मोदी

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी पंतप्रधानांबद्दल काही दिवसांपूर्वी काय वक्तव्य केले हे सर्वज्ञात आहे. आपल्याच पक्षातील ज्येष्ठ नेत्यांची पंतप्रधानांनी काय स्थिती करून ठेवली आहे याकडे प्रथम लक्ष द्यावे, असे धनंजय मुंडे यांनी ट्विटरच्या माध्यमातून म्हटले आहे.

लोकसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी पंतप्रधान मोदी आज महाराष्ट्र दौऱ्यावर आहेत. राज्यातील लोकसभा निवडणुकीच्या प्रचार वर्ध्यातून झाला. यावेळी बोलतांना मोदींनी राज्यातील काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या महाआघाडीवर निशाणा साधला महाराष्ट्रात काँग्रेस-राष्ट्रवादीची आघाडी कुंभकर्णासारखी आहे. महाराष्ट्रात सत्तेत असताना ते सहा-सहा महिने झोपून राहतात. मात्र आज मला आशीर्वाद देण्यासाठी लोकांची गर्दी, ही गर्दी बघून काँग्रेस-राष्ट्रवादीच्या नेत्यांची झोप उडेल, असे वक्तव्य मोदींनी केले.

महाराष्ट्रातील शेतकऱ्याने धरणात पाण्याची मागणी केली तेव्हा अजित पवारांनी काय उत्तर दिले हे तुम्हाला माहित आहे.त्यांनी मोठा सिंचन घोटाळा घडवून आणला . तसेच मावळमध्ये पवार कुटुंबाने शेतकऱ्यांवर गोळया चालवण्याचे आदेश दिले.स्वत: शेतकरी असून शरद पवार शेतकऱ्यांच्या समस्या विसरले, अशी टीकाही मोदींनी यावेळी केली.