मनसेत इनकमिंग सुरु, राष्ट्रवादीच्या मोठया नेत्याचा मनसेत प्रवेश

NCP leader joins MNS

अहमदनगर : महाराष्ट्र नवनिर्माण (MNS) सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) पाणी हिंदुत्वाची भूमिका स्वीकारल्यापासून पक्षात इनकमिंग सुरू झाले आहे. सोमवारी अहमदनगर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे (NCP) माजी जिल्हा उपाध्यक्ष बाळासाहेब माळी (Balasaheb Mali) यांनी आपल्या शेकडो समर्थकांसह मनसेत प्रवेश केला. शिर्डी येथे मनसेचे नेते मंत्री बाळा नांदगावकर यांच्या उपस्थितीत त्यांनी पक्षप्रवेश केला. गेल्या अनेक वर्षांपासून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून पारनेरच्या व जिल्हाच्या राजकारणात बाळासाहेब माळी सक्रिय होते. परंतु आता त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीला सोडचिठ्ठी देत मनसेत प्रवेश केला आहे.

पोलीस विभागातून निवृत्त झाल्यानंतर बाळासाहेब माळी हे सक्रीय राजकारणात उतरले होते. जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष सुजित झावरे पाटील यांचे ते खंदे समर्थक म्हणून ओळखले जायचे. त्यांनी पारनेर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये अनेक वर्षे संचालकपदही भूषवले आहे. राजकारणाबरोबरच एकलव्य फाउंडेशन व जाणता राजा प्रतिष्ठान या सामाजिक संघटनेच्या माध्यमातून त्यांनी तालुकाभर मोठा जनसंपर्क तयार केला आहे. २०१९ मध्ये संपन्न झालेल्या विधानसभा निवडणुकीपासून पक्षातील गटबाजीला कंटाळून अखेर त्यांनी मनसेत प्रवेश केला.

दरम्यान, आगामी काळात तालुक्याच्या प्रत्येक गावात मनसेची शाखा उघडून पक्ष संघटना अधिक बळकट करणार असल्याचे माळी यांनी सांगितले.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजलाMT LIKE OUR PAGE FOOTER