शिवसेनेचे आंदोलन म्हणजे विधानसभेसाठीची नौटंकी – राष्ट्रवादी

Amarsinh Pandit-SHIV SENA

मुंबई : शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी पीक विमा कंपन्यांच्या विरोधात आज मोर्चा काढला आहे. यावरून शिवसेनेवर विरोधकांनी टीकास्त्र सोडले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अमरसिंह पंडित यांनी शिवसेनेवर निशाणा साधला आणि शिवसेनेचा आजचा मोर्चा म्हणजे केवळ विधानसभेसाठीची नौटंकी असल्याचे म्हटले आहे. सत्तेत राहून सत्ता उपभोगायची आणि सत्तेतील आपल्या सहकारी पक्षाला विरोधसुद्धा करायचा, याला कसलं राजकारण म्हणायचं? असा टोलाही पंडित यांनी उद्धव ठाकरेंना लगावला आहे.

आगामी विधानसभेच्या निवडणुकीत भाजपने जर आपली साथ सोडली तर आपली गोची होईल, अशी भीती ठाकरे यांना आहे. त्यामुळे धरलं तर चावतंय आणि सोडलं तर पळतंय अशी गत आजच्या घडीला उद्धव ठाकरे यांची झाली, असे पंडित म्हणाले.

ही बातमी पण वाचा : विधानसभेसाठी कॉंग्रेस – राष्ट्रवादी अवलंबणार युतीचा फॉर्म्युला!

यावेळी बोलताना अमरसिंह पंडित म्हणाले की, विमा कंपन्यांना, शेतकरी पीक विम्याच्या स्वरूपात १०० टक्के रक्कम भरतो; मात्र नुकसान भरपाई म्हणून त्याची फक्त २० ते ३० टक्के देऊन बोळवण केली जाते. याला सरकार जबाबदार आहे. सरकार शेतकऱ्यांना १०० टक्के नुकसान भरपाई का देत नाही, असा सवाल पंडित यांनी उपस्थित केला. तसेच उद्धव ठाकरे यांच्यात हिंमत असेल तर त्यांनी पीक विमा कंपन्यांचा भरपाईचा निर्णय १०० टक्के करून दाखवावं, असं आव्हानच पंडित यांनी दिलं. पीक विमा कंपन्यांच्या संचालक मंडळावर बहुतांश लोक भाजपचे आहेत. ज्या काही देणग्या भाजपकडे आलेल्या आहेत त्यापैकी बहुतांश विमा कंपन्यांच्या कनेक्शनमधून आल्याचा दावासुद्धा पंडित यांनी यावेळी केला. नुकसान भरपाई तुम्ही शेतकऱ्यांना देणार नसाल तर काय फायदा विम्याचा? उद्धव ठाकरे कोणाविरोधी आंदोलने करत आहेत? त्यांनी केंद्र आणि राज्य सरकारची जी धोरणे आहेत त्याविरोधी बोलण्याची गरज आहे; पण उद्धव ठाकरे काहीही बोलू शकत नाहीत. त्यामुळे शिवसेनेची जी नौटंकी सुरू आहे, ती केवळ विधानसभेसाठी मतं मिळवण्यासाठी  असल्याची टीका पंडित यांनी केली. सेनेचे आंदोलन म्हणजे बोलाची कढी आणि बोलाचाच भात असल्याचे पंडित म्हणाले.