अजित पवार यांचा फोन हॅक ; आरोपी विरोधात तक्रार

Ajit Pawar

मुंबई : विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर सर्व राजकीय पक्ष कामाला लागले आहे . यादरम्यान निवडणुकांत काळ्या पैशांचे मोठे व्यवहार होत असतात. उमेदवारी मिळवण्यासाठीचे बहुतेक व्यवहार गैर पद्धतीने केल्या जातात . त्यात अनेकांची फसवणूकही केली जाते . राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्यासोबतही असाच प्रकार घडता घडता राहिला आहे . ऐन निवडणुकीच्या तोंडावर अजित पवार यांचा फोन हॅक झाल्याचे कळते .

ही बातमी पण वाचा:- रोहित पवारांची एवढी आहे संपत्ती

मुंबई राष्ट्रवादी काँग्रेसचे उपाध्यक्ष विश्वस्त नरेंद्र राणे यांना रविवारी सकाळी पक्षाचे नेते अजित पवार यांच्या नंबरवरून फोन आला. त्या फोनवर कुणाल नावाची व्यक्ती बोलत होती. ‘सध्या दादा पुण्यात आहेत. मात्र एका व्यक्तीला मुंबईत तातडीने मोठी रक्कम अदा करायची आहे. तुम्ही या बँक खात्यावर इतकी इतकी रक्कम तत्काळ भरण्याची व्यवस्था करा,’ असा निरोप होता.

राणे यांनी लगेच होकार कळवला आणि पैशाची व्यवस्था करण्यासाठी १० मिनिटे वेळ मागितला. राणे यांच्या मनात शंकेची पाल चुकचुकली. अजित पवार यांचा असा फोन कधीच येऊ शकत नाही, असा त्यांचा अंदाज होता. त्यांनी अजित पवार यांच्या स्वीय सहाय्यकांना फोन लावला तेव्हा अजित पवार पुण्यात असल्याचे कळले. राणे यांनी अर्ध्या तासाने अजित पवार यांना फोन लावला, काही वेळातच पैशाची व्यवस्था करतो, असे सांगितले. मात्र अजित पवार यांनी ‘मी तुम्हाला फोन केलेलाच नाही, माझा फोन माझ्याकडे आहे. कोणत्या पैशाचे बोलता,’ असा प्रतिप्रश्न अजित पवार यांनी केल्याने या सर्व प्रकरणावरून पडदा उठला आहे .

घडलेल्या प्रकारासंदर्भात राणेंनी पोलिसांकडे तक्रार केली आहे. अजित पवारांचा मोबाइल हॅक करुन त्या माध्यमातून आर्थिक फसवणुक करण्याचा प्रयत्न करण्यात आल्याचे राणे यांनी तक्रारीत म्हटले आहे.