अजित पवारच होणार उपमुख्यमंत्री?

Ajit Pawar

मुंबई : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर तयार झालेल्या राजकीय स्थितीमुळे राज्यात ऐतिहासिक आघाडीचा उदय झाला आहे. उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेना-काँग्रेस-राष्ट्रवादी या तीन पक्षांनी एकत्र येऊन सरकार स्थापन केलं आहे. मात्र अद्यापही मंत्रिमंडळाचं खातेवाटप झालेलं नाही. उपमुख्यमंत्रिपद कुणाकडे जाणार, याबाबत राजकीय वर्तुळात चर्चा रंगल्या आहेत . शासनाकडून दालन वाटप करताना मुख्यमंत्र्यांच्या दालनाजवळील सहाव्या मजल्यावरील मुख्य इमारतीतील मोठे दालन अद्यापपर्यंत कुणालाही देण्यात आलेले नाही.

माजी उपमुख्यमंत्री अजित पवार, एकनाथ खडसे, नंतर भाऊसाहेब फुंडकर हे वापरत असलेले दालन आता रिक्तच ठेवले आहे. हे दालन मुख्यमंत्री दालनानंतर सर्वांत  मोठे दालन म्हणून ओळखले जाते. मात्र नव्याने सहा मंत्री शपथ घेतलेल्या कोणत्याही मंत्र्याला हे दालन दिलेलं नाही. त्यामुळे अजित पवार यांच्यासाठीच हे दालन रिक्त ठेवण्यात आल्याची चर्चा दबक्या आवाजात सुरू आहे. दरम्यान राष्ट्रवादीतून बंड करून महाराष्ट्रात राजकीय भूकंप घडवणारे अजित पवार माघारी परतले असले तरी त्यांना उपमुख्यमंत्रिपद दिलं जाणार की नाही याबाबत अद्यापही निर्णय झालेला नाही.

शरद पवार यांनी अजित पवार यांना माफ केलं असेलही; मात्र त्यांचं अनाकलनीय वागणं पवारांना रुचलेलं नाही. त्यामुळेच त्यांच्याकडे उपमुख्यमंत्रिपदासारख्या महत्त्वाच्या पदाची धुरा देण्याची पवारांची इच्छा नसल्याचे कळते.

तुलनेने हजरजबाबी व मनमिळावू स्वभावाचे जयंत पाटील यांना या जबाबदारीसाठी पवारांनी पसंती दिल्याचे पक्षातील सूत्रांनी सांगितले. अजित पवार यांना उपमुख्यमंत्रिपद देणार किंवा कसे याबाबत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये दबक्या आवाजात चर्चा सुरू असली तरी शिवसेनेकडून अजित पवार यांचा योग्य सन्मान राखला जायला हवा, असा दबाव आहे.