
पंढरपूर : पंढरपूर-मंगळवेढा मतदारसंघात उमेदवारी अर्ज माघारी घेण्याचा आज शेवटचा दिवस आहे. त्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीचे (NCP) प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (Jayant Patil) पंढरपुरात दाखल झाले आहेत. या निवडणुकीत भाजपचा (BJP) करेक्ट कार्यक्रम करण्याची आखणी त्यांनी केली. पंढरपूर-मंगळवेढा मतदारसंघातील पोटनिवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस भाजपला मोठा धक्का देण्याच्या तयारीत आहे. भाजपचे कल्याणराव काळे लवकरच राष्ट्रवादीत प्रवेश करण्याची शक्यता आहे. यापूर्वी शरद पवारांच्या (Sharad Pawar) दौऱ्यातही कल्याण काळे (Kalyan Kale) स्टेजवर पाहायला मिळाले होते. मात्र आता मोठ्या घडामोडी घडताना दिसून येत आहे.
भाजपचे नेते आणि सहकार शिरोमणी वसंतराव कारखान्याचे अध्यक्ष कल्याण काळे यांचा पूर्ण गट राष्ट्रवादीच्या भगीरथ भालकेंचा प्रचार करणार असल्याची माहिती मिळाली आहे. कल्याण काळे यांनीही कार्यकर्त्यांची बैठक घेत राष्ट्रवादीचा प्रचार करण्याचे निश्चित केले आहे. आज दुपारी काळेंच्या आढीवच्या फार्म हाऊसवर जयंत पाटील स्नेहभोजनासाठी आले असता बंदद्वार झालेल्या चर्चेनंतर काळे यांनी राष्ट्रवादीत प्रवेश करण्याचा निर्णय घेतला असल्याची माहिती पुढे आली आहे.
गेल्या काही दिवसांपूर्वी सरकोली येथे झालेल्या कार्यक्रमात कल्याण काळे हे राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्यासोबत एकाच मंचावर उपस्थित होते. त्यावेळीही कल्याण काळे पुन्हा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार असल्याच्या चर्चांना उधाण आलं होतं.
विशेष म्हणजे त्या कार्यक्रमात काळे यांनी केलेल्या एका वक्तव्याचीही चांगलीच चर्चा झाली होती. आपण यापुढे शरद पवार साहेब जे सांगतील त्या पद्धतीने काम करू, असे कल्याण काळे यांनी म्हटले होते.
बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला