राष्ट्रवादीचा पंकजा मुंडेंना मोठा धक्का, होमग्राउंडवरील नगरपालिका राष्ट्रवादीच्या ताब्यात

Pankaja Munde & NCP

बीड : भाजपच्या नेत्या आणि माजी मंत्री पंकजा मुंडे (Pankaja Munde) यांना राष्ट्रवादी काँग्रेसने (NCP) जबर धक्का दिला आहे. त्यांच्या होमग्राउंडवर भाजपच्या ताब्यात असलेली माजलगाव नगरपालिका राष्ट्रवादीने आपल्या ताब्यात घेतली आहे. हा पंकजासाठी मोठा धक्का मानला जात आहे. नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीत भाजपने पूर्णपणे माघार घेतल्याने राष्ट्रवादीच्या शेख मंजूर यांची बिनविरोध निवड झाली.

भाजप नगराध्यक्ष सहाल चाऊस यांना बरखास्त केल्यावर आज नगराध्यक्षपदाची निवडणूक संपन्न झाली. या निवडणुकीत भाजपने माघार घेतल्यामुळे राष्ट्रवादीच्या शेख मंजूर यांची नगराध्यक्षपदी बिनविरोध निवड झाली. भाजपची सत्ता असलेली नगरपालिका राष्ट्रवादीच्या ताब्यात गेल्याने कुतुहलाचा विषय ठरला आहे.

दरम्यान, दसरा मेळाव्यात जोरदार भाषण करुन राजकारणात नव्याने मुसंडी मारण्याचा इशारा दिलेल्या भाजप नेत्या पंकजा मुंडे यांना बीडमधूनच जबर धक्का मिळाला आहे. माजलगाव नगरपालिका भाजपच्या ताब्यात होती, मात्र नगराध्यक्ष सहाल चाऊस यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप होऊन अटक झाल्यानंतर त्यांच्यावर अविश्वास ठराव मांडण्यात आला. राष्ट्रवादीचे आमदार प्रकाश सोळंके यांनी संधी साधून भाजपच्या गोटातील काही नगरसेवक राष्ट्रवादीच्या गळाला लावले आणि आपला गड मजबूत केला.

भाजपने नगराध्यक्षपदाचा उमेदवार जाहीर केला होता, मात्र भाजपचे माजी नगराध्यक्ष सहाल चाऊस यांनी राष्ट्रवादीसोबत घरोबा करुन पंकजा मुंडेंनाच जबर धक्का दिला. मोहन जगताप आघाडीचे ४, राष्ट्रवादीचे ७, भाजपचा १ आणि शिवसेनेचे २ असे १४ संख्याबळ राष्ट्रवादीचे होते. सहाल चाऊस गटाच्या ४ नगरसेवकांनी बिनशर्त पाठिंबा जाहीर केल्याने एकूण संख्याबळ १८ झाले. त्यामुळे नगराध्यक्ष म्हणून राष्ट्रवादीचे शेख मंजूर यांचा बिनविरोध निवडीचा मार्ग सुकर झाला.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER