विधानसभेसाठी कॉंग्रेस-राष्ट्रवादी अवलंबणार युतीचा फॉर्म्युला

NCP-Congress

लोकसभेत काँग्रेसपेक्षा राष्ट्रवादीचा परफॉर्मन्स उत्तम राहिला आहे. त्याचाच फायदा घेत राष्ट्रवादीने ५०-५० चा फॉर्म्युला मांडला आहे.


मुंबई : आगामी विधानसभेची जोरदार तयारी आघाडीने सुरू केली आहे. जागावाटपाच्या चर्चेसाठी काँग्रेस-राष्ट्रवादीची बैठक नुकतीच पार पडली. या बैठकीत जागावाटपासंबंधी राष्ट्रवादीकडून नवा फॉर्म्युला मांडण्यात आला आहे. विधानसभा निवडणुकीत आघाडी युतीचा फॉर्म्युला अवलंबणार आहे.

राष्ट्रवादीने ५०-५० चा फॉर्म्युला वापरण्याचा निर्णय घेतला आहे. विधानसभेत कॉंग्रेस-राष्ट्रवादीनं समसमान जागा लढवाव्यात, असा प्रस्ताव राष्ट्रवादीकडून कॉंग्रेसला देण्यात आला आहे. लोकसभा निवडणुकीत कॉंग्रेसची जी वाताहत झाली त्यानंतर राष्ट्रवादीने हा निर्णय घेतला आहे. यापूर्वी जागावाटपात राष्ट्रवादीपेक्षा काँग्रेस नेहमीच वरचढ राहिली आहे; पण आता चित्र बदललं असल्याचा राष्ट्रवादीचा दावा आहे.

लोकसभेत काँग्रेसपेक्षा राष्ट्रवादीचा परफॉर्मन्स उत्तम राहिला आहे. त्याचाच फायदा घेत राष्ट्रवादीने ५०-५० चा फॉर्म्युला मांडला आहे. काँग्रेसनं मात्र जागावाटबाबत नवा प्रस्ताव राष्ट्रवादीसमोर ठेवला आहे. मागील निवडणुकीत जिंकलेल्या जागा त्या-त्या पक्षाकडे राहतील. तसंच ज्या जागांवर जो पक्ष दुसऱ्या नंबरवर होता ती जागा त्या पक्षाकडे जाईल, असा काँग्रेसचा प्रस्ताव आहे. काँग्रेसच्या या फॉर्म्युल्यानुसार काँग्रेसच्या वाट्याला १०६ आणि राष्ट्रवादीकडे ९५ जागा जातील. तर उरलेल्या ८७ जागांच्या वाटपावर मित्रपक्षांसह चर्चा होणार आहे.