अजित पवारांच्या निर्णयाला माझा पाठिंबा नाही- शरद पवार

sharad-pawar-ajit-pawar

मुंबई : राज्याच्या राजकारणात मोठी उलथापालथ घडली आहे. या घटनेने सर्वांच्या भुवया उंचावल्या आहेत. देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्रिपदाची तर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली.

राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या उपस्थितीत राजभवनात हा शपथविधी पार पडला. त्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांचं अभिनंदन केलं आहे. मात्र अजित पवार यांच्या राजकीय निर्णयाला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा पाठिंबा नाही. हा त्यांचा वैयक्तिक निर्णय आहे, असं राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी म्हटलं आहे. त्यामुळे सत्तास्थापनेच्या मुद्यावरून राष्ट्रवादी फुटली, हे आता स्पष्ट झालं आहे. आज सकाळी भाजपला पूर्ण बहुमत नसल्याने राष्ट्रवादीच्या अजित पवार यांच्या मदतीनं त्यांनी हे सरकार स्थापन केलं आहे.

देवेंद्र फडणवीसांनी घेतली मुख्यमंत्रिपदाची शपथ

अजित पवार यांनीही उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली आहे. या सगळ्या शपथविधी सोहळ्यात राष्ट्रवादीकडून फक्त अजित पवार कुटुंब दिसलं आहे. राष्ट्रवादीचे इतर कोणतेही नेते किंवा स्वत: शरद पवार हे यावेळी कुठेही दिसले नाहीत. त्यामुळे राष्ट्रवादीतला एक मोठा गट फोडून अजित पवारांनी भाजपला पाठिंबा दिला का, अशी चर्चा जोर धरू लागली आहे. शरद पवार हे जेव्हा या सगळ्या घटनाक्रमाबद्दल प्रतिक्रिया देतील तेव्हाच याबाबतची स्पष्टता होऊ शकणार असून याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.