राष्ट्रवादी काँग्रेस ठाकरे सरकारमधून सध्या बाहेर पडू शकत नाही! राजकीय विश्लेषकांचे मत

Mahavikas Aghadi

मुंबई : केंद्रीय गृहमंत्री अमित शहा (Amit Shah) आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar), राष्ट्रवादीचे नेते प्रफुल्ल पटेल (Praful Patel) यांची अहमदाबादेत गुप्त भेट झाल्याची माहिती समोर आल्याने राजकीय वर्तुळात उलटसुलट चर्चा रंगल्या आहेत. दुसरीकडे अमित शहा आणि शरद पवार यांची भेट झाली असे जरी मानले तरी त्यात शरद पवारांची विश्वासार्हता, त्यांची प्रतिमा आणि आता सत्तेबाहेर पडणे परवडणारे नसल्याचे मत राजकीय विश्लेषकांनी वर्तविले आहे.

शरद पवार यांचे सर्वच राजकीय पक्षांशी आणि पक्षांच्या नेत्यांची चांगले संबंध आहेत. पंतप्रधान मोदी (PM Narendra Modi) यांनी बारामतीत येऊन शरद पवार हे आपले राजकीय गुरू असल्याचे म्हटले होते. दुसरीकडे ते बंगालमध्ये काँग्रेसचा (Congress) विरोध डावलून ममता बॅनर्जी (Mamata Banerjee) यांच्या पक्षाचा प्रचार करण्यासाठी जात आहेत. शेतकरी आंदोलनाच्या मुद्द्यावर त्यांनी डावे आणि अन्य पक्षांच्या नेत्यांसह राष्ट्रपतींची भेट घेतली होती. तर दक्षिणेत ते काँग्रेसचा विरोधक असलेल्या डाव्यांसोबत आहेत. त्यामुळे शरद पवार यांचे सर्वच पक्षांशी चांगले संबंध आहेत, असे ज्येष्ठ पत्रकार संजय आवडे यांनी सांगितले.

सध्या महाविकास आघाडीतून किंवा सत्तेतून बाहेर पडणं कुणालाही परवडणारं नाही. महाराष्ट्रातील नागरिकांच्या नजरा सरकारकडे आणि विरोधी पक्ष असलेल्या भाजपकडेही आहेत. महाविकास आघाडी सरकारमध्ये सर्व काही आलबेल आहे असंही नाही. यापूर्वी भाजप-शिवसेनेच्या काळात किंवा काँग्रेस-राष्ट्रवादीच्या काळातही सर्व काही आलबेल होतं असं नाही. पण सध्याच्या काळात महाविकास आघाडी सरकारमधून (Mahavikas Aghadi) कोणत्याही पक्षाला बाहेर पडणं परवडणारं नाही. तसंच शरद पवार यांची सत्तेबाहेर पडून भाजपसोबत जाण्याची मानसिकताही वाटत नसल्याचं आवटे यांनी म्हटले.

दरम्यान राज्यात मागील काही दिवसांपासून महाविकास आघाडी सरकारच्या मंत्र्यांवर अनेक आरोप झाले आहेत. त्यातच मुंबईत स्फोटकांची कार सापडल्याप्रकरणी सचिन वाझेंना अटक करण्यात आली. या प्रकरणाचा तपास राष्ट्रीय तपास यंत्रणा एनआयए करत आहे. तर खासदार मोहन डेलकर आत्महत्याप्रकरणावरून भाजप आणि राष्ट्रवादीमध्ये आरोप प्रत्यारोपाच्या फैऱ्या झडल्या होत्या. त्यामुळे अशी काही भेट झाली आहे का, याबद्दल तर्कवितर्क लढवले जात आहेत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button