राष्ट्रवादी-भाजप नेत्याच्या गाठीभेटी; नव्या राजकीय समीकरणाचे संकेत?

मुंबई :- मुकेश अंबानी (Mukesh Ambani) यांच्या घराजवळ आढळून आलेय स्फोटकांप्रकरणी एनआयएने सहायक पोलीस निरीक्षक सचिन वाझे यांना अटक केली आहे. या प्रकरणानंतर विरोधकांनी घेतलेल्या आक्रमक भूमिकेनंतर ठाकरे सरकारला मुंबई पोलीस आयुक्तांची बदली करावी लागली. या प्रकरणाने ठाकरे सरकारची मोठी नाचक्की झाली असून विरोधकांनीही हे प्रकरण उचलून धरले आहे. एवढेच नव्हे तर मित्र पक्ष असलेल्या काँग्रेस (Congress) आणि राष्ट्रवादीनेही (NCP) काही प्रश्न उपस्थित केले आहेत.

त्यामुळे या प्रकरणात शिवसेना एकाकी पडली आहे. त्यातच राष्ट्रवादी आणि भाजप नेत्यांच्या गाठीभेटी सुरू झाल्या आहेत. त्यामुळे या सर्व प्रकरातून राज्यात नवे राजकीय समीकरण उद्भवणार तर नाही ना?, अशी चर्चा आता राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे.

आज सकाळी राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार (Rohit Pawar) यांनी विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर (Praveen Darekar) यांची त्यांच्या निवासस्थानी जाऊन भेट घेतली. मात्र रोहित पवार आणि दरेकर यांच्या भेटीचं कारण अद्यापही गुलदस्त्यात आहे. दरेकरांनी ही सदिच्छा भेट असल्याचं म्हटलं आहे. वाझे प्रकरणावरून विरोधकांनी सरकारला कोंडीत पकडलं आहे. त्यामुळे शिवसेनेची मोठी पंचाईत झाली आहे. असं असताना कोणत्याही कारणाशिवाय केवळ रोहित पवारांनी दरेकरांची सदिच्छा भेट घेतल्याने त्याचे अनेक राजकीय अर्थ निघत आहेत. ही सदिच्छा भेट दहा मिनिटांची होती. रोहित पवार पक्षाचा काही निरोप घेऊन दरेकरांकडे आले होते का? असा प्रश्नही या निमित्ताने उपस्थित केला जात आहे. अचानक झालेल्या या भेटीचे भेट देणाऱ्याने आणि भेट घेणाऱ्याने समाधानकारक उत्तर न दिल्याने (की टाळल्याने) या भेटीवर तर्कवितर्क लढवले जात आहेत. तसेच ही भेट म्हणजे शिवसेनेसाठी धोक्याचे संकेत असल्याचंही बोललं जात आहे.

वाझे प्रकरणात शिवसेनेला विरोधकांनी चोहोबाजूने घेरले आहे. या प्रकरणी पोलीस आयुक्तांच्या बदल्या करण्यात आल्या असल्या तरी विरोधक गप्प झालेले नाहीत. विरोधकांनी गृहमंत्री अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांचा राजीनामा मागितला आहे. पूजा चव्हाण प्रकरणात कोणताही गुन्हा दाखल झालेला नसताना संजय राठोड यांचा राजीनामा घेण्यात आला. मग अनिल देशमुख हे खातं सांभाळण्यात अपयशी ठरल्याने त्यांचाही राजीनामा का घेऊ नये, असं खुद्द शिवसेनेतूनच बोललं जात आहे. देशमुखांचा राजीनामा घेतल्यास वाझे प्रकरण थंड होईल, असं शिवसेना नेत्यांचं म्हणणं असल्याचं सूत्रांनी सांगितलं. देशमुखांच्या राजीनाम्यासाठी राष्ट्रवादीवर शिवसेनेकडून दबाव वाढत चालल्यानेच रोहित पवार यांनी दरेकरांची भेट घेऊन शिवसेनेला राजकीय मेसेज दिला असावा, असं राजकीय जाणकार सांगत आहेत.

राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार (Sharad Pawar) यांच्या राजकारणाचे अनेक अर्थ काढले जातात. पवारांचा अर्थ सत्ता के साथ भी, सत्ता के बाद भी असाही राजकारणात घेतला जातो. म्हणजे शरद पवार एक तर प्रत्यक्ष सत्तेत असतात किंवा सत्तेत नसतील तर सत्तेच्या जवळच असतात. 2014 मध्ये मोदींची लाट असताना त्यांनी महाराष्ट्रात लगेचच भाजपला पाठिंबा दिला होता. मोदींच्या बाजूने लोकमत असल्याचं कारण देत त्यांनी पाठिंबा दिला होता. भाजपसोबत बार्गेनिंग करण्याची शिवसेनेची पॉवरच पवारांनी काढून घेतली होती. त्यानंतर आता संधी मिळताच त्यांनी शिवसेनेसोबत सत्ताही स्थापन केली.

भाजपने सचिन वाझे प्रकरण (Sachin Vaze Case) केवळ शिवसेनेपर्यंतच मर्यादित ठेवलं आहे. या प्रकरणी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी अनेक सवाल केले. परंतु हे सर्व प्रश्न शिवसेनेशी जुळलेले होते. त्यांनी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर क्विचितच या प्रकरणी टीका केली. दुसरीकडे पवारांनीही एनआयएच्या तपासाबाबत सावध भूमिका घेत राष्ट्रवादीची बाजू सावरून धरली. अशा सर्व परिस्थितीत रोहित पवार यांचं दरेकरांना भेटणं नव्या राजकीय समीकरणाचे संकेत देत आहेत का? असा सवाल केला जात आहे.

ही बातमी पण वाचा : असे उपद्व्याप केल्याने पुन्हा सत्ता मिळेल हा विरोधकांचा भ्रम, शिवसेनेचा भाजपला टोला

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER