ठाण्यात शिवसेनेविरोधात राष्ट्रवादी, भाजपा, काँग्रेस आलेत सोबत !

NCP, BJP, Congress come together against Shiv Sena in Thane

ठाणे :- सत्ताधारी शिवसेनेकडून (Shivsena) विरोधी पक्षांचा आवाज दाबला जात असल्याचा आरोप करत गुरुवारी ठाणे महापालिकेत (TMC) काँग्रेस, (Congress) राष्ट्रवादी काँग्रेस (NCP) आणि भाजपच्या (BJP) नगरसेवकांनी सोबत येत आयुक्तांची भेट घेतली. राष्ट्रवादी काँग्रेसमधील गटबाजीमुळे चमत्कार घडला.

गुरुवारी दोन्ही काँग्रेसच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांनी भाजपाला साथ देत – महापालिकेचा कारभार शिवसेनेतील ठराविक नेत्यांची ‘प्रायव्हेट लिमिटेड कंपनी’ चालवत असल्याचा आरोप केला. मात्र, भाजपला साथ देण्यास विरोध करत राष्ट्रवादीतील नगरसेवकांचा एक गट यापासून दूर राहील्याने राष्ट्रवादीतील गटबाजी उघड झाली.

ठाणे महापालिकेत शिवसेनेची एकहाती सत्ता आहे. राष्ट्रवादी काँग्रेसकडे विरोधी पक्ष नेते पद आहे. भाजपाला विरोधी पक्ष पद मिळू नये म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सत्तेत सहभागी नसला तरी अनेक विषयांवर शिवसेना-राष्ट्रवादी एकच भूमिका घेतात. राष्ट्रवादीचे नगरसेवक शानू पठाण हे विरोधी पक्षनेते होताच त्यांनी सत्ताधारी शिवसेनेविरोधात मोर्चा उघडला.

त्याचबरोबर काँग्रेस आणि भाजपाकडूनही सत्ताधारी शिवसेनेविरोधात सूर लावला जात होता. सोमवारी या तिन्ही पक्षांच्या नगरसेवकांनी सोबत येऊन महापालिका आयुक्त डॉ. विपीन शर्मा यांची भेट घेतली. विरोधी पक्ष नेते शानू पठाण, राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नगरसेवक हणमंत जगदाळे, भाजपाचे गटनेते मनोहर डुंबरे आणि काँग्रेसचे नगरसेवक विक्रांत चव्हाण यांच्यासह इतर नगरसेवक उपस्थित होते.

मनपाच्या सर्वसाधरण सभेत ठराविक नगरसेवकांनाच बोलण्याची संधी दिली जाते. इतर नगरसेवकांचा आवाज बंद केला जातो, असा आरोप शानू पठाण यांनी केला.

ठाणे महापालिकेच्या वेबिनारद्वारे होणाऱ्या सभेत एखाद्या विषयाविरोधात मत मांडणाऱ्या सदस्यांचा आवाज बंद केला जातो, हा लोकशाहीचा अपमान आहे, असे हणमंत जगदाळे यांनी सांगितले. सर्वसाधारण सभेत विरोधकांचे आवाज बंद केले जातात आणि मर्जीतील नगरसेवकांनाच बोलू दिले जाते. शहराच्या दृष्टीने महत्त्वाचे ठराव आहेत, ते अद्यापही धूळखात पडून आहेत. आयत्या वेळेचे ठरावही चुकीच्या पद्धतीने मंजूर केले जात आहेत, असे मनोहर डुंबरे यांनी सांगितले. विशिष्ट पक्षाची हुकुमशाही तसेच विशिष्ट प्रकारच्या व्यक्तीच्या माध्यमातून सभागृह चालणार असेल तर ते चूक आहे. कायद्याच्या चौकटीत राहून कारभार करा, अन्यथा त्याचे परिणाम भोगावे लागतील, असे विक्रांत चव्हाण यांनी सांगितले.

राष्ट्रवादीत गटबाजी

राष्ट्रवादी काँग्रेसचे ठाण्यातील नेते जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांचे कट्टर समर्थक असणारे विरोधी पक्षनेते शानू पठाण यांनी शिवसेनेच्या विरोधातील तीन पक्षीय शिष्टमंडळाचे नेतृत्व केले. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या समर्थकांपैकी पक्षाचे पालिकेतील गटनेते नजीब मुल्ला भाजपासोबत गेले नाहीत. मुल्ला यांच्या दालनात पक्षाच्या नगरसेवकांचा एक गट उपस्थित होता.

याबाबत महापौर नरेश म्हस्के म्हणालेत की, सभागृहात कुणाचाही आवाज बंद केला जात नाही. हेच नगरसेवक एकमेकांचा आवाज बंद करतात. एखाद्या विषयावर बोलण्यासाठी भाजपाच्या नगरसेवकांमध्येच स्पर्धा लागते. आयुक्तांकडे तक्रार करणे अयोग्य आहे. त्यांनी पीठासीन अधिकारी म्हणून माझ्याकडे तक्रार करायला पाहिजे होती. कोणाला बोलू द्यायचे, हा माझा अधिकार आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button