राज ठाकरेंनी ईडीची चौकशी झाल्यापासून बोलायचेच कमी केले : अजित पवार

Raj Thackrey-Ajit Pawar

पुणे : आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी ईडी चौकशी झाल्यापासून बोलायचेच कमी केले असल्याचे वक्तव्य राष्ट्रवादीचे नेते आणि माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले आहे . कोहिनूर मिलप्रकरणी काही दिवसांपूर्वी राज ठाकरे यांना ईडीची नोटीस बजावण्यात आली होती . सरकारविरोधात भूमिका घेतल्यानेच राज ठाकरेंमागे ईडी चौकशी करण्यात आली असल्याच्या चर्चा राजकीय वर्तुळात सुरू होत्या; पण सरकारने कितीही चौकशा लावल्या तरीही माझा आवाज बंद होणार नाही, असं राज ठाकरेंनी म्हटलं होतं. मात्र आता अजित पवार यांनी, राज ठाकरे यांनी चौकशीनंतर बोलायचेच कमी केले असल्याचे विधान केल्याने प्रत्येकाच्या भुवया उंचावल्या आहेत.

ही बातमी पण वाचा : आरेतील मेट्रो कारशेडवरून संघर्षः मनसेचा शिवसेनेला पाठींबा !

‘सत्ताधारी पक्ष पैशांची आणि विविध चौकश्यांची भीती दाखवत आहेत, असा आरोप विरोधकांकडून सतत केला जात आहे . तसेच राष्ट्रवादीवर गंभीर आरोप करत काँग्रेस सोडणाऱ्या हर्षवर्धन पाटील यांच्यावरही अजित पवार यांनी भाष्य केले. ‘तीन पिढ्या सरकारमध्ये असताना आणि मंत्रिपद देऊनही काही लोक पक्ष सोडून जात आहेत’ असं म्हणत अजित पवार यांनी भाजपप्रवेशाच्या तयारीत असणाऱ्या हर्षवर्धन पाटील यांच्यावर अप्रत्यक्ष निशाणा साधला आहे.

दरम्यान गेल्या काही दिवसांपूर्वी विधानसभेचे तत्कालीन विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. तसेच आताही कॉंग्रेस आणि राष्ट्रवादीचे अनेक नेते भाजप आणि सेनेच्या वाटेवर आहेत. त्यामुळे येणाऱ्या विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या अडचणी वाढणार आहेत. ऐन निवडणुकीच्या तोंडावर भाजप –सेना युतीची ताकद वाढत आहे. तर काँग्रेस -राष्ट्रवादी कमकुवत होताना दिसत आहे.

ही बातमी पण वाचा : विधानसभेत मनसे स्वतंत्र लढणार?