जेजुरीत शिवाजी महाराजांचा पुतळा उभारण्यासाठी राष्ट्रवादी आक्रमक

NCP - Shivaji Maharaj

पुणे : स्वराज्याचे संस्थापक आणि महाराष्ट्राचे कुलदैवत असलेल्या खंडेरायाच्या जेजुरी नगरीमध्ये आता शिवाजी महाराजांच्या पुतळ्यावरून राजकारण तापले आहे. जेजुरी नगरपरिषदेच्या निवडणुकीमध्ये काँग्रेसने जेजुरी नगरीत छत्रपती शिवाजी महाराजांचा भव्य पुतळा उभारण्याचे आश्वासन दिले होते. मात्र आता चार वर्षे लोटूनही शिवाजी महाराजांचा पुतळा उभारला गेला नसल्याने शिवप्रेमींकडून पुतळा उभारण्याची जोरदार मागणी होत आहे. तर विरोधी पक्ष असलेल्या राष्ट्रवादीने आक्रमक भूमिका घेतली आहे.

चार वर्षांत पुतळा का उभारला गेला नाही? असा प्रश्न राष्ट्रवादीने सत्ताधारी काँग्रेसला केला आहे. त्यामुळे जेजुरीत सत्ताधारी काँग्रेस आणि विरोधी पक्ष राष्ट्रवादीत कलगीतुरा रंगला आहे. शहाजी महाराज आणि छत्रपती शिवाजी महाराज या पितापुत्रांची भेट जेजुरी नगरीमध्ये झाली होती. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या जेजुरी नगरीत पुणे-पंढरपूर महामार्गावर छत्रपती शिवाजी महाराजांचा भव्य अश्वारूढ पुतळा लवकरात लवकर उभारावा, ही जेजुरीकरांची मागणी आहे. पुरंदर तालुक्यातील सासवडमधील भव्य अश्वारूढ पुतळ्याच्या धर्तीवर जेजुरीतही छत्रपती शिवाजी महाराजांचा भव्य पुतळा उभारू, असे आश्वासन देत जेजुरी नगरपरिषदेच्या गेल्या निवडणुकीत काँग्रेसने सत्ता हाती घेतली होती.

मात्र सत्तेत आल्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्याबाबत कुठल्याच हालचाली केल्या नसल्याचे दिसून आले. शिवप्रेमींकडून हा पुतळा उभारण्याची मागणी करण्यात येत आहे. संभाजी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष अजयसिंह सावंत यांनी राजकारण बाजूला ठेवून महाराजांचा पुतळा लवकरात लवकर उभारावा अशी मागणी केली आहे. जेजुरी नगरपरिषदेच्या नगराध्यक्ष वीणा सोनवणे यांनी मात्र आपण आश्वासनावर ठाम असल्याचे सांगितले.

निवडणुकीच्या आधी काँग्रेसने दिलेला शब्द पूर्ण करू, शिवप्रेमींचा ऊर अभिमानाने भरून येईल असा महाराजांचा अश्वारूढ पुतळा उभारणार असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. तर जेजुरी नगरपरिषदेतील राष्ट्रवादीचे पक्षनेते जयदीप बारभाई यांनी मात्र सत्ताधाऱ्यांनी गेल्या चार वर्षांत महाराजांचा पुतळा का उभारला नाही? असा संतप्त सवाल केला आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER