सांगली जिल्हा परिषदेवर राष्ट्रवादी पुन्हा, जयंत पाटील दुसऱ्यांदा भाजपचा कार्यक्रम करणार ?

Jayant Patil

सांगली : महापालिकेच्या महापौरपदाच्या निवडणुकीत पुरेसे बहुमत असूनही भाजपाला राष्ट्रवादीच्या खेळीमुळे पराभवाची धूळ चाखावी लागली. सांगली-मिरज-कुपवाड महापालिकेच्या महापौर पदावर राष्ट्रवादी काँग्रेसचे दिग्विजय सूर्यवंशी आणि उपमहापौर पदावर काँग्रेसचे उमेश पाटील विजयी झाले. ऐन निवडणुकीत भाजपाच्या सात नगरसेवकांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवाराला मत दिल्याने राष्ट्रवादीला महापौरपदाची लॉटरी लागली. सांगली महापालिकेत राष्ट्रवादीचा महापौर झाल्यानंतर आता राष्ट्रवादीने जिल्हापरिषदेवर सत्ता मिळवण्यासाठी हालचाली सुरु केल्या आहेत. यासाठी राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील(Jayant Patil) यांनी वेट अँड वॉचची भूमिका घेत भाजपच्या नाराज असलेल्या जिल्हा परिषद सदस्यांना गळाला लावण्यासाठी हालचाली सुरू केल्या आहेत.

महापालिकेत राष्ट्रवादीने दिलेल्या धक्क्यानंतर भाजपकडून जिल्हा परिषदेतील पदाधिकारी बदलासाठी हालचाली सुरू झाल्या आहेत. या सदस्यांना नेत्यांच्या निरोपाची प्रतीक्षा लागून राहिली आहे, दोन दिवस कळ काढा, बैठकीचा निरोप मिळेल असं उत्तर नेत्यांकडून मिळालं आहे, जिल्हा परिषदेतील पदाधिकारी बदलासाठी भाजपाचे सदस्य आक्रमक झाले आहेत. महापालिकेतील गोंधळामुळे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांची गुरूवारची नियोजित बेठक रद्द करण्यात आली. महापालिका निवडणुकीत बसलेल्या धक्क्यातून सावरण्यासाठी भाजपा नेते वेळ घेत आहेत, गुरुवारची बैठक प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी रद्द केली, तरी भाजपाचे अनेक सदस्य दिवसभर जिल्हा परिषदेत थांबून होते,

भाजपाच्या या नाराज सदस्यांवर काँग्रेस-राष्ट्रवादीही बारकाईने लक्ष ठेऊन आहे, महापालिकेचा पॅटर्न जिल्हा परिषदेत राबवता येतो का? याची चाचपणीही सुरू आहे, जिल्हा परिषदेचा कार्यकाळ अवघ्या 1 वर्षाचा शिल्लक असल्याने अनेक उलाथापालथी पाहायला मिळू शकतात. पदाधिकाऱ्यांमध्ये बदल न झाल्यास प्रसंगी अविश्वास ठरावाचा पवित्राही घेतला जाऊ शकतो, त्यात काँग्रेस-राष्ट्रवादीही वाहत्या गंगेत हात धुण्याची तयारी आहे. आणि यासाठी राष्ट्रवादीकडून हालचाली सुरूझाल्याची माहिती पुढे येत आहे. जर भाजपविरोधात अविश्वास प्रस्ताव आणला गेला तर नाराज सदस्यांना आपल्या गोटात घेऊन जिल्हापरिषदेवर राष्ट्रवादीचा झेंडा फडकवण्यासाठी नेत्यांनी प्रयत्न सुरू केल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER