आज राज्यात शेतकरी संघटनांचं आंदोलन, तर राष्ट्रवादीचाही सक्रिय पाठिंबा

Sharad Pawar

मुंबई :- केंद्राने मंजूर केलेल्या कृषी कायद्याविरोधात गेल्या आठ दिवसांपासून हजारो शेतकऱ्यांचं आंदोलन दिल्लीच्या वेशीवर सुरू आहे. अशा वेळी शेतकऱ्यांच्या दिल्लीतील आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी राज्यात उग्र आंदोलन करण्याचा निर्णय महाराष्ट्रातील शेतकरी संघटनांनी घेतला आहे. महाराष्ट्रात आज उग्र आंदोलन करण्याचा निर्णय अखिल भारतीय किसान संघर्ष समन्वय समितीच्या महाराष्ट्र राज्य समितीच्या बैठकीत घेण्यात आला आहे.

केंद्र सरकारच्या शेतकरीविरोधी धोरणांच्या निषेधार्थ सुरू असलेले देशव्यापी आंदोलन आणखी तीव्र करण्यासाठी आज महाराष्ट्रात उग्र आंदोलन करण्याचा निर्णय अखिल भारतीय किसान संघर्ष समन्वय समितीच्या महाराष्ट्र राज्य समितीच्या बैठकीत घेण्यात आला. त्याला राष्ट्रवादी काँग्रेसनेही सक्रिय पाठिंबा दिला आहे. राष्ट्रवादीचे (NCP) प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (Jayant Patil) यांनी याबाबत माहिती दिली. केंद्र सरकारच्या शेतकरीविरोधी धोरणांच्या विरोधात देशस्तरावर शेतकरी संघटनांनी दिल्ली येथे सुरू केलेल्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी ३ डिसेंबर २०२० रोजी महाराष्ट्रात सर्व समविचारी शेतकरी संघटना व कामगार संघटना राज्यभर आंदोलन करत आहेत. दिल्ली येथील आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी राज्यात होत असलेल्या या आंदोलनाला राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सक्रिय पाठिंबा देत आहे, अशी माहिती जयंत पाटील यांनी दिली.

तर दुसरीकडे, दिल्लीतील शेतकऱ्यांच्या आंदोलनाला आता महाराष्ट्र काँग्रेसनं पाठिंबा दिला आहे. त्यासाठी आज राज्यातील प्रत्येक तालुक्यात आंदोलन करण्यात येणार आहे. तशी घोषणा प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी काल केली होती. महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसकडून एक पत्रक काढण्यात आलं आहे. त्यात दिल्लीच्या सीमांवर सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनाला पाठिंबा दर्शवण्यात आला आहे. शेतकरी आंदोलनाला समर्थन आणि कृषी कायद्याला विरोध दर्शवण्यासाठी आज राज्यातील प्रत्येक तालुक्यात आंदोलन करण्याचे आदेश महसूलमंत्री आणि प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात (Balasaheb Thorat) यांनी दिले आहेत. जिल्ह्यातील प्रत्येक ब्लॉक मुख्यालयात हे आंदोलन करण्यात येणार आहे.

ही बातमी पण वाचा : शेतकरी आंदोलनाला ट्रक ऑपरेटर्सचा पाठिंबा, ८ डिसेंबरपासून संपावर जाण्याचा इशारा

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER