‘एनसीबी’ने सादर केले ६६ हजार पानी आरोपपत्र

NCB - Sushant Singh Rajput
  • सुशांत सिंग मृत्यूशी संबंधीत अमली पदार्थांचे प्रकरण

मुंबई : बॉलिवूड (Bollywood) अभिनेता सुशांत सिंग राजपूत (Sushant Singh Rajput) यांच्या मृत्यूच्या प्रकरणातून उघड झालेल्या अमली पदार्थांच्या अवैध वापराशी संबंधीत खटल्यात केंद्र सरकारच्या अखत्यारितील अमली पदार्थविरोधी विभागाने (Narcotics Control Bureau-NCB) शुक्रवारी येथील विशेष न्यायालयात तब्बल ६६ हजार पानांचे पहिले आरोपपत्र सादर केले.

अमली पदार्थविरोधी कायद्याखालील (NDPS ACT) खटल्यांसाठीच्या विशेष न्यायालयात सादर झालेले हे आरोपपत्र दोन भागांत आहे. त्यातील सुमारे ११,७०० पाने प्रत्यक्ष कागदपत्रांच्या स्वरूपात आहेत तर बाकीची ५० हजार ‘डिजिटल’ पाने ‘सीडी’च्या स्वरूपात आहेत.

हे आरोपपत्र एकूण ३३ आरोपींविरुद्ध आहे. त्यात बॉलिवूडची अभिनेत्री व सुशांत सिंगचे एकेकाळची मैत्रिण रिया चक्रवर्ती, तिचा भाऊ शोविक चक्रवर्ती, अ‍ॅजिसिलाओस डेमेट्रियाडेस (अभिनेता अर्जून रामपालची सहचरी गॅब्रिएला डेमेट्रियाडेस हिचा भाऊ ) आणि ‘धर्मा पॅडक्शन्स’चा माजी कर्मचारी क्षितिज प्रसाद इत्यादींचा समावेश आहे. ३३ पैैकी आठ आरोपी अद्याप न्यायालयीन कोठडीत आहेत. आरोपपत्रात २०० साक्षीदारांची यादीही देण्यात आली आहे.

‘एनडीपीएस’ कायद्याच्या कलम ८ (सी), २० (बी) (२), २२, २७ ए, २९ आणि ३० अन्वये गुन्ह्यांसाठी खटला चालविण्यासाठी हे आरोपपत्र आहे.

तपास अद्याप अपूर्ण असून यथावकाश पुरवणी आरोपपत्र सादर केले जाईल, असेही ‘एनसीबी’ने नमूद केले आहे. पहिल्या आरोपपत्रात उल्लेख असलेल्या सर्व आरोपी व साक्षीदारांना समन्स जारी करण्याची त्यात विनंती करण्यात आली आहे. त्यासाठी न्यायालय लवकरच तारीख निश्चित करेल.

तपासाच्या दरम्यान आरोपींकडून चरस, गांजा, ‘एलएसडी’ आमि ‘एक्स्टेसी’ यासारखे नशिले पदार्थ व ‘अल्पाझोलाम’ आणि ‘क्लोनाझेपॅम’ यासारखे मादक पदार्थ हस्तगत करण्याात आल्याचा दावा त्यात आहे. शिवाय आरोपींचे मोबाईल फोन, संगणक, व्हॉट्सअ‍ॅप संदेश, बँक खात्यांमधील व्यवहार इत्यादींचे सविस्तर विश्लेषण करून आरोपींनी अमली पदार्थ अवैध मार्गाने कुठून व कसे मिळविले, ते जवळ कसे बाळगले व त्यांचे सेवन कसे केले याचा छडा लावण्यात आला आहे, असेही ‘एनसीबी’चे म्हणणे आहे.

-अजित गोगटे

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER