नयनाताईंनी व्यसनमुक्तीसाठी शेवटपर्यंत लढा दिला : डॉ. सायली सारडे

sarde 2

नागपूर :- नयनाताईंनी शेवटपर्यंत व्यसनमुक्तीचा लढा देत महिला सबलीकरणासाठी मोठे कार्य केले असल्याचे मत प्रा. डॉ. सायली सारडे यांनी व्यक्त केले.

दाभा येथील सत्यनारायण नुवाल गुरुकुल व्यसनमुक्ती केंद्रात ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या, साहित्यिक आणि विदर्भ आंदोलनाच्या नेत्या डॉ. नयना धवड- पांडे यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. त्या प्रसंगी डॉ. सायली सारडे बोलत होत्या. यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी डॉ. शिवराज देशमुख व अतिथी म्हणून डॉ. संजीव सारडे उपस्थित होते.

डॉ. सारडे म्हणाल्या, डॉ. नयनाताईंच्या जाण्याने विदर्भाचे मोठे नुकसान झाले आहे. त्यांनी सातत्याने महिलांमध्ये जागरूकता निर्माण केली. पुरुषांच्या व्यसनाधीनतेचा त्रास कुटुंबातील महिलांना होत असल्याने त्यांनी महिलांचा लढा उभारला. त्यांनी एक गावही दत्तक घेतले होते.

ही बातमी पण वाचा : महापौर नंदा जिचकार यांची ‘द न्यूयॉर्क टाईम्स’ने घेतली दखल

डॉ. शिवराज देशमुख यांनी नयनाताईंचे गुरुकुलशी असलेले नाते विशद केले. तीन वर्षे त्यांनी गुरुकुलमधील शिबिरार्थ्यांना व्यसनमुक्त होण्यासाठी मार्गदर्शन केले. त्यांच्या कार्याची दखल घेत सी.मो.झाडे फाउंडेशनतर्फे त्यांना मीराबेन शहा सामाजिक कार्य पुरस्काराने गौरविण्यात आले होते. त्यांनी व्यसनमुक्तीवर लिहिण्यास सुरुवात केली होती. नागपूर दारूमुक्त करण्यासाठी लढा उभारण्यात यावा याबाबत त्यांनी विचारही व्यक्त केले असल्याचे सांगितले.

डॉ. संजीव सारडे यांनी नयनाताई या संपूर्ण दाभावासीयांसाठी पाठबळ होत्या. विधायक कामात त्यांचा सातत्याने पुढाकार असायचा. त्याचे सामाजासाठी जगणे, त्यांचे साहित्य यामुळे त्या कायमच जिवंत राहणार असल्याचे सांगत श्रद्धांजली अर्पण केली.