तब्बल 9.50 लाखांचे बक्षिस असलेला नक्षली नेता गडचिरोलीत पोलिसांना शरण

नागपूर :- शिरावर तब्बल 9 लाख 50 हजार रुपयांचे बक्षिस असलेला वरिष्ठ नक्षली नेत्याने आज महाराष्ट्रातील गडचिरोली जिल्ह्यात पोलिसांसमोर शरणागती पत्करली. विलास उर्फ दसरू कोल्हा (44) असे त्या नक्षल्याचे नाव असल्याचे पोलिसांनी म्हटले आहे. कोल्हा हा नक्षल्यांच्या विभागीय कमेटीचा सदस्य होता आणि तो जिल्ह्यातील नक्षली कारवाया संचालित करत असल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे. जिल्हा पोलिस अधिक्षक शैलेश बलकवडे यांच्यासमोर तो शरण आला असून त्याने त्याच्याकडील एके-47 असॉल्ट रायफल आणि तीन मॅगझीन तसेच 35 राऊंड पोलिसांच्या स्वाधीन केले आहे.

कोल्हाने 2000 साली नक्षल चळवळीत प्रवेश केला होता. सद्या तो उत्तर गडचिरोलीत कार्यरत होता. त्याच्याविरुद्ध जिल्ह्यात 149 गुन्हे नोंदीत आहे. ज्येष्ठ तेलगू नेत्यांकडून नक्षल कार्यकर्त्यांचे होणारे शोषण प्रामुख्याने महिला कर्मचा-यांच्या शोषणामुळे आपण त्रासलो होतो. त्यामुळेच शरण येण्याचा निर्णय घेतल्याचे कोल्हा याने म्हटले आहे.